भारतीय पुरुष हॉकी संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात बरोबरीत समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्याच सामन्यात भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्ताशी पडली होती. सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने सामन्यात आघाडी कायम ठेवली होती. अखेरच्या क्षणापर्यंत २-१ अशी आघाडी असताना तिसऱ्या पंचांनी दिलेल्या दोन वादग्रस्त निर्णयांमुळे पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे भारताला हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावं लागलं आहे.

अपेक्षेप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. पहिल्या सत्रापासून भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानी खेळाडूंनीही भारताला तितकीच चांगली टक्कर दिली. अखेर एस. व्ही. सुनीलने दिलेल्या पासवर नवोदीत दिलप्रीत सिंहने १९ व्या मिनीटाला बॉल गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर पाकिस्तानवर दबाव टाकण्याची पुरेपूर संधी भारताकडे उपलब्ध होती, मात्र त्या संधीचा लाभ उठवणं भारतीय खेळाडूंना जमलं नाही.

दुसऱ्या सत्रात पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या आक्रमणाची धार वाढवत, भारतीय गोलपोस्टवर हल्ले करण्यास सुरुवात केली. मोहम्मद रिझवान सिनीअर आणि इतर अनुभवी खेळाडूंनी पाकच्या आक्रमणाची धुरा आपल्या हाती घेत, भारतीय बचावफळीतला ताळमेळाचा अभाव उघडा पाडला. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यात भारताचे बचावपटू सपशेल अपयशी ठरले. मात्र १९ व्या मिनीटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नवर पाकिस्तानी गोलकिपरला चकवत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. मध्यंतरीच्या काळात भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या, मात्र भरवशाच्या रुपिंदरपाल सिंहने आजच्या सामन्यात पुरती निराशा केली.

मध्यांतरीच्या सत्रानंतर पाकिस्तानने पुन्हा आक्रमक सुरुवात करत भारतीय गोलपोस्टवर हल्ले केले. मात्र गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या बचावासमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही. अखेर ३८ व्या मिनीटाला पाकिस्तानच्या इरफान ज्युनिअरने सुरेख मैदानी गोल करत पाकिस्तानचं खातं उघडलं. यानंतर अखेरच्या सेकंदापर्यंत पाकिस्तानी आक्रमणाला थोपवून धरण्यात भारताने यश मिळवलं. मात्र अखेरच्या क्षणी तिसऱ्या पंचांनी दोन वादग्रस्त निर्णय देत पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर बहाल केला. या संधीचा फायदा घेत अली मुबाशिरने श्रीजेशला चकवत पाकिस्तानचा दुसरा गोल केला. सामना संपल्यानंतर भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी तिसऱ्या पंचांकडे शेवटच्या दोन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आपला निषेध नोंदवला. मात्र पहिल्याच सामन्यात बरोबरी पदरी पडल्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज निर्माण झालेली आहे.