गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी श्रेयसी सिंह ही भारतातल्या सर्वोत्तम डबल ट्रॅप नेमबाजांपैकी एक मानली जाते. आज झालेल्या सामन्यात श्रेयसीने ९६ गुण मिळवत अखेरच्या शुट ऑफमध्ये बाजी मारली. श्रेयसीमुळे भारताला सातव्या दिवशी पहिलं सुवर्णपदक मिळालं.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल २०१८, ऑस्ट्रेलिया – डबलट्रॅप नेमबाजीत भारताला सुवर्णपदक, श्रेयसी सिंहची धडाकेबाज कामगिरी

२६ वर्षीय श्रेयसी सिंहला तिच्या घरातूनच नेमबाजीचं बाळकडू मिळालं आहे. श्रेयसीचे आजोबा कुमार नरेंद्र सिंह आणि वडील दिग्वीजय सिंह हे राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. दिग्वीजय सिंहहे पाचवेळा खासदारही राहिलेले आहेत. २०१० साली श्रेयसी सिंहने दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मात्र या स्पर्धेत तिला यश मिळालं नाही.

यानंतर २०१३ साली मेक्सिकोत झालेल्या नेमबाजी विश्वचषकात श्रेयसीला १५ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मात्र ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसीला रौप्यपदक मिळालं होतं. याचसोबत २०१४ साली झालेल्या इंचॉन आशियाई खेळांमध्ये श्रेयसीला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. २०१७ साली राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतही श्रेयसीने रौप्यपदक मिळवलं होतं. त्यामुळे आपल्या रौप्यपदकाचं रुपांतर श्रेयसीने सुवर्णपदकात करत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.