कोल्हापुरातील तेजस्विनी सावंतने ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची हॅटट्रीक केली आहे. आज झालेल्या ५० मी. प्रोन रायफल प्रकारात तेजस्विनीने रौप्य पदकाची कमाई केली. याआधी २००६ मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तेजस्विनीने १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण तर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक मिळवलं होतं. यानंतर दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तेजस्विनीने ५०. मी रायफल थ्री पोजीशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. यानंतर सलग तिसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तेजस्विनीने पदकाची कमाई करत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

तेजस्विनीच्या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात २५ वं पदक पडलं आहे. अंतिम फेरीत तेजस्विनीने ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं. तेजस्विनीच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून तिचं कौतुक केलं जातं आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियात कोल्हापूरच्या तेजस्विनीचा डंका, ५०. मी प्रोन रायफल नेमबाजीत रौप्यपदकाची कमाई

माझ्या मुलीचा मला अभिमान, तेजस्विनीच्या आईची प्रतिक्रीया

सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तेजस्विनीने भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे तिची कामगिरी पाहून मला अतिशय आनंद झालेला आहे. गेल्या काही वर्षांपासून तेजस्विनी कुहिली गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिच्या या प्रवासात तिचे पती समीर दरेकर व सासरच्या मंडळीनी पाठींबा दिल्यामुळे हे यश मिळवणं शक्य झालेलं आहे.

  • सुनीता सावंत, तेजस्विनीची आई