गेल्या महिन्यात पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. आंततराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने संजिता उत्तेजण चाचणी दोषी आढलली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे संजिता चानूला आपलं सुवर्णपदक गमवावं लागण्याची शक्यता आहे. संजिता चानूने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये ५३ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

‘नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई केली जात आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल’, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने दिली आहे. यासंबंधी घेण्यात येणारा निर्णयही जाहीर करु असं त्यांनी सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने यासंबंधी विस्तृत माहिती देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत माहिती शेअर करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान अनेकांचं लक्ष संजिताकडे होतं. चार वर्षांपुर्वी ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकलं होतं. ५३ किलो वजनी गटात निवड झाल्यानंतर तिथेही तिने आपली निवड सार्थ ठरवली. कुंजाराणी देवी यांच्यापासून प्रेरणा घेत संजिताने वेटलिफ्टिंगमध्ये रस घेण्यास सुरुवात केली होती.