भारतीय ज्युदोपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ज्युदोमध्येही शानदार कामगिरी साकारली. सुशीला लिक्माबम हिने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली तर नवज्योत चानाने अंतिम फेरीत प्रवेश करत आपले पदक निश्चित केले आहे.  
पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात चाना याने दक्षिण आफ्रिकेच्या डॅनियल ले ग्रँग याचा १ मिनिटे ५१ सेकंदात पाडाव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. चाना याला उपांत्यपूर्व फेरीत मात्र खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले. वेल्सच्या ब्रेंडन डॉजने त्याला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. अखेर ३ मिनिटे ४९ सेकंदात चाना याने बाजी मारली. पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या टॉम पप्पास याचा पराभव करण्यासाठी चानाला तब्बल पाच मिनिटे झुंज द्यावी लागली.
महिलांमध्ये, मणिपूरच्या सुशीलाने ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. सुशीलाने ऑस्ट्रेलियाच्या क्लोए रायनेर हिला २ मिनिटे २३ सेकंदात हरवत सुवर्णपदाकासाठीच्या लढतीत स्थान मिळवले. मात्र अंतिम फेरीत सुशीलाला स्कॉटलंडच्या रेनिक्स हिच्याकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅमी मेयर हिला २ मिनिटे ३८ सेकंदात पराभूत केले होते, तर पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यास तिला फक्त १ मिनीट ४१ सेकंद लागली होती. तिने पहिल्या फेरीत कॅमेरूनच्या मानी मेद्झा हिला हरवले
होते.
महिलांमध्ये कल्पना थौडाम (५२ किलो) आणि पुरुषांमध्ये मनजीत नंदाल (६६ किलो) हेसुद्धा कांस्यपदकाच्या शर्यतीत आहेत. त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी रिपिचेज फेरीद्वारे कांस्यपदक पटकावण्याची संधी त्यांना आहे.

बॅडमिंटनमध्ये भारताकडून घानाचा धुव्वा
सायना नेहवालच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाने सलामीच्या लढतीत नवख्या घानाचा ५-० असा धुव्वा उडवला. पारुपल्ली कश्यपने २७ मिनिटांच्या लढतीत डॅनियल सामवर २१-६, २१-१६ असा विजय मिळवला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने स्टेला अमासाहचा २१-७, २१-५ असा धुव्वा उडवला. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने इमॅन्युअल डोनकर आणि अब्राहम अयिटेय जोडीवर २१-७, २१-११ अशी मात केली. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने डायना आर्चर आणि इव्हालुयन बोटवे जोडीला २१-४, २१-१० असे नमवले. मिश्र दुहेरीच्या लढतीत पी.सी. तुलसी आणि किदम्बी श्रीकांत जोडीने डॅनियल साम आणि स्टेला अमासाह जोडीचा २१-५, २१-९ असा पराभव केला.

टेबलटेनिसपटूंची शानदार सुरुवात
भारताच्या पुरुष आणि महिला टेबलटेनिस संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत शानदार सुरुवात करताना अनुक्रमे वनुआतू आणि बार्बाडोस या संघांवर मात केली. शामिनी कुमारसेन, मानिका बात्रा आणि मधुरिका पाटकर यांच्या महिला संघाने गेल्या वेळी रौप्यपदक पटकावणाऱ्या बार्बाडोसचा ३-० असा धुव्वा उडवला. शामिनीने शेरिक फेलिक्स हिला ११-३, ११-२, ११-३ असे सहज पराभूत केले. त्यानंतर मानिकाने अ‍ॅथोनेट्टे रिले हिचा ११-२, ११-५, ११-२ असा पाडाव करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शामिनी-मधुरिका जोडीने क्रिस्टल हार्वे-रिले जोडीवर ११-४, ११-४, ९-११, ११-३ अशी मात केली. आघाडीचा टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमालला सलामीच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. हरमीत देसाईने हॅम लूलू याचा ११-२, ११-३, ११-५ असा पाडाव केला व सनील शेट्टीने योशूआ शिंग याला ११-६, ११-२, ७-११, ११-१ असे हरवले. शेट्टी-अँथनी अमलराज जोडीने अ‍ॅलन लिन-शिंगला  ११-६, ११-५, ११-४ असे नमवले.

जलतरण : साजन प्रकाश २०व्या स्थानी
भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशला पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात अंतिम फेरीत मजल मारण्यात अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नांत तो चौथ्या स्थानी होता, पण २८ जणांमधून त्याला २०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात भारताचा पॅराजलतरणपटू प्रसंता कर्माकर याने १.०४.८६ सेकंद अशी कामगिरी नोंदवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्याने चौथ्या क्रमांकावर मजल मारली.

भारताचा पॅरापॉवरलिफ्टर उत्तेजक चाचणीत दोषी
राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताची मान शरमेने खाली गेली आहे. भारताचा पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरी हा राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले आहे.

सायकलपटूंनी निराशा केली
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने  सायकलिंगमध्ये पुरुषांच्या स्प्रिंट तसेच ४०० मीटर सांघिक प्रकारात भारताने निराशाजनक कामगिरी केली. स्प्रिंट प्रकाराच्या पात्रता फेरीत अमरजित नागी, अमरित सिंग आणि अ‍ॅलन बेबी यांनी अनुक्रमे २२वे, २३वे आणि २५वे स्थान पटकावले.

तीन स्क्वॉशपटूंची विजयी सलामी
भारताची अनका अलंकामोनी, हरिंदर पाल संधू आणि महेश माणगावकर या स्क्वॉशपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्क्वॉश प्रकारात विजयी सलामी नोंदवली. अनकाने केनियाच्या खालेका निमजी हिचा ११-२, ११-३, ११-६ असा पराभव केला. दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. महेशने केनियाच्या हरदीप रिल याचा पराभव केला. हरिंदरने आर्यलडच्या मायकेल क्रेगला ११-९, ११-५, ११-५ असे हरवले.

भारतीय तिरंग्याचा अवमान
उद्घाटन सोहळ्यादरम्यान स्पर्धेचे अधिकृत गीत वाजवले जात असताना भारतीय तिरंगा उलटा दाखवण्यात आला. ‘लेट द गेम बिगिन’ हे अधिकृत गीत स्टेडियममध्ये वाजवण्यात येत होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाचा झेंडा स्वयंसेवकांनी प्रदर्शित केला होता. भारताचा ध्वज प्रदर्शित करणाऱ्या स्वयंसेवकांनी भारताचा तिरंगा उलटा प्रदर्शित केला. गीत संपेपर्यंत तिरंगा त्याच स्थितीत होता. मात्र कोणीही तिरंगा योग्य पद्धतीने प्रदर्शित होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.