कनिष्ठ गटातील विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी जाण्याच्या तयारीत असलेले चार सायकलपटू आणि दोन सहकारी कर्मचारी यांना स्वित्झर्लंडने व्हिसा नाकारला आहे. मात्र, त्यावर येत्या काही दिवसात तोडगा काढला जाण्याची शक्यता असल्याचे भारतीय सायकलिंग संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

येत्या १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान कनिष्ठ विश्व अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सायकलपटू बिलाल डार, गुरुप्रीतसिंग, नमन कपिल आणि वेंकप्पा शिवप्पा यांनी व्हिसासाठी अर्ज केले होते. तसेच त्यांच्यासह प्रशिक्षक अमरसिंग आणि मनोज साहू यांनीदेखील त्यांच्यासमवेत अर्ज केले होते. मात्र देशात येण्याचे कारण आणि कालावधी दिलेला नाही व अन्य दोन कारणे पुढे करीत त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या तरी या खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे.