रोलँड गॅरोस येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत चेक प्रजासत्ताकाच्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. ४० वर्षांनंतर एका चेक प्रजासत्ताकच्या महिलेने हे विजेतेपद जिंकले आहे. जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या बाबरेराने अंतिम फेरीत रशियाच्या अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाचा ६-१, २-६, ६-४ असा पराभव केला.

बाबरेरापूर्वी हाना मेंडलीकोवाने १९८१ मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती चेक प्रजासत्ताकची पहिली महिला खेळाडू ठरली. काही दिवसांपूर्वी स्ट्रान्सबर्ग येथे जेतेपद पटकावणाऱ्या क्रेजिकोव्हाने कारकीर्दीत ३३व्या क्रमांकावर मजल मारली होती. उपांत्य फेरीत ग्रीसच्या मारिया सकारी हिच्याबरोबर तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत विजय मिळवून क्रेजिकोव्हाने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

 

२००६मध्ये कनिष्ठ गटाची अंतिम फेरी खेळणाऱ्या पाव्हल्यूचेन्कोव्हाने आपल्या ताकदवान खेळाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. तब्बल १५ वर्षांनंतर अनेक चढउतारांना सामोरे जात कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी तिच्यासमोर होती, मात्र बाबरेराने तिचे स्वप्न धुळीस मिळवले.

 

पाव्हल्यूचेन्कोव्हाने उपांत्य फेरीत स्लोव्हेनियाच्या तामरा झिदानसेक हिचे आव्हान दोन सेटमध्ये सहज परतवून लावले होते. जमिनीलगतचे फटके लगावण्यात पटाईत असलेल्या पाव्हल्यूचेन्कोव्हाने अंतिम फेरीच्या प्रवासापर्यंत आर्यना सबालेंका आणि विक्टोरिया अझारेंका यांचा पाडाव केला होता.

पाव्हल्यूचेन्कोव्हा आणि क्रेजिकोव्हा प्रथमच एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या.