क्रिकेट एके क्रिकेट, ही डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमची आतापर्यंतची ओळख; पण क्रिकेटची ही परंपरा मोडीत काढत हे स्टेडियम आता एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) या फुटबॉलच्या सोहळ्यासाठी डी. वाय. पाटील स्टेडियम नटले आहे. मुंबई सिटी फुटबॉल संघाचे घरच्या मैदानावरील सामने नवी मुंबईतील या स्टेडियमवर होणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी आयएसएलची संकल्पना समोर आल्यानंतर आणि पावसाळ्याआधी क्रिकेटचा मोसम संपल्यानंतर मैदानावरील गवत वाढवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) नियुक्त केलेले इंग्लंडमधील वेम्बले स्टेडियमचे खेळपट्टीविषयक संचालक ग्रेग गिलिन यांनी स्टेडियमच्या गोलाकार खेळपट्टीला फुटबॉलच्या १२० यार्डाच्या आयताकृती स्टेडियममध्ये बसविण्याचे काम केले.

खेळपट्टीवर २३ सें.मी.चे गवत
क्रिकेटसाठी मैदानावर साधारणत: ५ सें.मी.चे गवत असावे लागते; पण फुटबॉल सामन्यांसाठी हे गवत २३ सें.मी. इतके ठेवण्यात आले आहे. मैदानावरील क्रिकेटच्या खेळपट्टय़ांवर या हिरव्यागार गवताची चादर अंथरली आहे. स्टेडियममध्ये यापूर्वीच पाण्याचा निचरा (ड्रेनेज) होण्याची व्यवस्था असल्यामुळे भर पावसातही फुटबॉलचा सामना अविरतपणे सुरू राहणार आहे.

१६ कॅमेरे आणि एलईडी
फुटबॉलच्या सामन्यांसाठी सर्व खेळपट्टीवर समान उजेड असावा लागतो. त्यासाठी गोदरेज कंपनीची मदत घेऊन मैदानात वेगळे फ्लडलाइट्स बसविण्यात आले आहेत. मुख्य मैदानापासून चार मीटरच्या अंतरावर एलईडी बसविण्याचे काम सुरू असून लाइन कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. तसेच सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी स्टेडियममध्ये तब्बल १६ कॅमेरे लावले जाणार आहेत.

आयएसएलच्या सामन्यांना तुफान गर्दी होईल – विजय पाटील
‘‘क्रिकेटनंतर फुटबॉल हा माझा सर्वात आवडता खेळ. आयएसएलच्या निमित्ताने फुटबॉलमध्येही काम करण्याची संधी मला मिळाली. अन्य खेळांसाठीही डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे दरवाजे कायम खुले आहेत. रॉबर्ट पिरेस, निकोलस अनेल्का, फ्रेड्रिक लुम्बर्ग, जुआन कॅपडेव्हिया असे एकापेक्षा दिग्गज फुटबॉलपटू खेळणार असल्यामुळे आयएसएलच्या सामन्यांना नक्कीच गर्दी होईल, असे चित्र दिसत आहे. या महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी देशातील फुटबॉलपटूंना मिळणार असल्यामुळे येत्या काही वर्षांत भारतीय फुटबॉलचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे,’’ असे डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

खेळाडूंसाठी ड्रेसिंगरूमचा कायापालट
इंग्लिश प्रीमिअर लीग किंवा ला लीगा फुटबॉल स्पर्धेत खेळाडू मैदानात उतरताना एका बोगद्यातून बाहेर येतात. तसाच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव चाहत्यांना यावा, यासाठी पुढे मोठय़ा आकाराचा फुटबॉल लावलेल्या एका बोगद्यातून खेळाडू सामना खेळण्यासाठी मैदानात अवतरणार आहेत. खेळाडूंच्या ड्रेसिंगरूमचाही कायापालट करण्यात आला आहे. सामन्यासाठी तयार होताना सर्व खेळाडूंच्या जर्सी आणि त्याचे साहित्य एकत्रितपणे एका रेषेत ठेवले जाते.