दिल्ली संघातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर
प्रो कबड्डी लीगमधील दबंग दिल्ली हा संघ सध्याच्या घडीला तळाला आहे. खेळाडूंच्या बेजबाबदारपणामुळे संघाची वाईट कामगिरी होत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली संघातील ‘दबंगांची भाऊबंदकी’ चव्हाटय़ावर आली. दिल्लीचे प्रशिक्षक बलवंत सिंग यांनी तर संघातील खेळाडू आपले काहीच ऐकत नसल्याचे सांगितले, तर कर्णधार रविंदर पहलने तर मला या संघातच राहायचे नसल्याचे सांगत सर्वानाच धक्का दिला. पण दिल्लीचाच चढाईपटू सूरजीत सिंगने संघात सारे काही आलबेल असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी खेळाडूंच्या बंडाळीबाबत सांगिल्यावर सूरजीतचे सारे पितळ मात्र उघडे पडले.
‘‘दिल्लीच्या संघनिवडीमध्येच समस्या आहे. संघातील खेळाडूंची या स्तरावर खेळण्याची कुवतच नाही. मला ऐन क्षणी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारावे लागले. त्यानंतरही संघातील खेळाडू माझे काहीच ऐकत नाहीत. त्यामुळेच संघाची कामगिरी कशी होत आहे, हे तुम्हा साऱ्यांसमोर आहे,’’ असे प्रशिक्षक बलवंत सिंग यांनी सांगितले.
याबाबत कर्णधार पहल म्हणाला की, ‘‘संघातील वातावरणामुळे तर मला या संघात राहायचेच नाही. हा संघ सोडण्याचा विचार मी करत आहे. मैदानात खेळतानाही संघात उत्साहाचे वातावरण नसते. त्याचबरोबर त्या वेळी आखलेली रणनीती कुणीही अमलात आणत नाही. त्यामुळे पुढच्या हंगामात या संघातून खेळण्याचा विचारच मी करू शकत नाही.’’
प्रशिक्षक सिंग यांनी याबाबत सांगितले की, ‘‘जर पुढच्या वेळी मला संघ निवडण्याचा अधिकार दिला तर या संघातील चार खेळाडूही मी कायम ठेवणार नाही. या संघातील खेळाडूंची या स्तरावर खेळण्याची पात्रताच नाही. यापूर्वी साइचे प्रशिक्षकपद भूषवताना मी चांगले निकाल दिले आहेत. या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारताना माझी प्रतिष्ठा पणाला लागली होती, पण संघाच्या कामगिरीमुळे मी हतबल झालो आहे.’’
या साऱ्याबाबत सूरजीत म्हणाला की, ‘‘संघात चांगले वातावरण आहे, सारे काही आलबेल आहे. आम्ही चांगला सराव करत आहोत. संघभावनेने मैदानात उतरत आहोत.’’
‘‘आमच्या संघात हिंदीमधून बोलले जाते आणि आम्हाला ते काही कालावधीनंतर समजते. ,’’ असे दक्षिण कोरियाच्या सेयाँग किम सांगितले.

प्रशिक्षकांचा फायदा झाला -संदीप नरवाल
‘‘गेले दोन वर्षे आमच्या संघासाठी प्रशिक्षक नव्हते. त्यामुळे खेळाडूच प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. पण या वर्षी प्रशिक्षक संघात आल्यावर आमच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाला आहे. प्रशिक्षकांनी चांगली रणनीती आखली, आमच्या चुका दाखवल्या, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा चांगला अभ्यास केला. त्यांनी प्रत्येक छोटी गोष्टही आम्हाला समजवून सांगितली आणि त्यामुळेच आम्ही या हंगामात दमदार कामगिरी करू शकलो,’’ असे पाटणा पायरेट्सच्या संदीप नरवालने सांगितले.