राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना ४० रुपयांऐवजी १४० रुपये दैनंदिन भत्ता दिला जाईल, असेमहाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे (एमओए) अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी जाहीर केले.
संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्षस्थानी पवार हे उपस्थित होते. ‘‘वाढती महागाई, तसेच खेळाडूंना प्रशिक्षण, सराव व अन्य सुविधांकरिता येणारा वाढता खर्च लक्षात घेऊन खेळाडूंच्या दैनंदिन भत्त्यात वाढ करावी अशी मागणी गेली अनेक वर्षे विविध खेळाडू व प्रशिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करूनच भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला,’’ असे पवार यांनी सांगितले.
राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा गेली अनेक वर्षे वाढत्या आर्थिक खर्चामुळे आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासनातर्फे सात कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाईल, असेही पवार यांनी एमओएच्या बैठकीत जाहीर केले. ही स्पर्धा पूर्वीसारखी एका ठिकाणी न घेता पाच किंवा सहा विभागात घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी ज्या खेळांच्या एकत्रित सुविधा असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्याच्या निर्णयावरही या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये घेतली जाईल व या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड केली जाईल. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळविणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे पाच, तीन व दोन लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी अव्वल दर्जाची व्हावी यासाठी एमओएतर्फे लवकरच आहारतज्ज्ञाची नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवावे यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्याचे ऑलिम्पिक भवन शिवछत्रपती क्रीडानगरीतच उभारले जाणार आहे. या भवनाकरिता जागांची पवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली तसेच जागाही निश्चित केली. लवकरच त्याचे भूमिपूजन केले जाणार आहे. या भवनात विविध खेळांच्या राज्य संघटनांची कार्यालये स्थापन केली जाणार आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २२ सप्टेंबर रोजी येथे आयोजित केली जाणार आहे.