भारतीय संघाची फलंदाजांची फळी शक्तिशाली आहे; परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या वीरेंद्र सेहवागची फलंदाजी धडकी भरवणारीच होती, असे मत दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले. जगातील दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या स्टेनला सेहवागला गोलंदाजी करणे नेहमी आव्हानात्मक वाटायचे. सेहवागबाबत स्टेन म्हणाला की, ‘‘भारतात मी यापूर्वीही खेळलो आहे आणि सेहवागसारख्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी केली आहे. सेहवाग दु:स्वप्नासारखा होता. त्याने आमच्याविरुद्ध चेन्नईत ३०० धावा केल्या होत्या. त्याला एकदा जीवदान दिल्यावर तो नेहमीच प्रतिस्पर्धी संघाची तारांबळ उडवायचा.’’ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे. याबाबत स्टेन म्हणाला की, ‘‘सध्याच्या संघात भारतीय फलंदाजांची दमदार फौज आहे, परंतु त्यांच्यात सेहवागसारखा दम नाही. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून सेहवाग गोलंदाजांवर तुटून पडायचा.’’