जोहान्सबर्ग कसोटीत पहिल्या डावात शिखर धवनला बाद केल्यानंतर डेल स्टेनला तब्बल ६९ षटके विकेटसाठी प्रतीक्षा करावी लागली. या कालखंडात भारतीय फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर २१७ धावांची लयलूट केली. मात्र सर्वोत्तम खेळाडू कोणत्याही क्षणी फॉर्मात येऊ शकतात, याचा प्रत्यय डेल स्टेनने घडवून दिला. प्रचंड वेग, उसळी घेणारे चेंडू आणि जोडीला अचूकता यासह धडाडलेल्या ‘स्टेनगन’समोर भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. १ बाद १८१ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३३४ धावांत संपुष्टात आला. यानंतर ग्रॅमी स्मिथ आणि अल्विरो पीटरसन यांनी बिनबाद ८२ मजल मारत दक्षिण आफ्रिकेला चांगल्या स्थितीत आणले.  
पावसाच्या हजेरीमुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ उशिराने सुरू झाला. पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही वर्चस्व राखले. भारतीय चाहत्यांना प्रतीक्षा होती ती मुरली विजयाच्या शतकाची. मात्र त्याआधीच डेल स्टेन नामक वादळाने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. या वादळाने चेतेश्वर पुजाराच्या रूपाने पहिला बळी घेतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला पुजारा शतकाकडे आगेकूच करत होता, मात्र स्टेनच्या अप्रतिम चेंडूवर यष्टीपाठी एबी डी व्हिलियर्सने त्याचा झेल टिपला. पुजाराने ७० धावा केल्या. लगेचच स्टेनच्याच एका उसळत्या चेंडूवर मुरली विजयचा झेल उडाला आणि डी व्हिलियर्सने आणखी एक चांगला झेल टिपत त्याला माघारी धाडले. विजयचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने २२६ चेंडूत १८ चौकारांसह ९७ धावांची खेळी केली.
मुंबईकर रोहित शर्माला विदेशी खेळपट्टीवर आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी होती. मात्र स्टेनचा वेग त्याच्या पचनी पडला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. हॅट्ट्रिकची संधी असताना विराट कोहलीने पुढच्याच चेंडूवर चौकार लगावत दडपण कमी केले. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अर्धशतकाच्या सीमेवर असतानाच कोहलीला (४६) मॉर्केलने बाद केले. त्यानंतर कोहलीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह सहाव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली. धोनी (२४) खेळपट्टीवर स्थिरावलाय असे वाटत असतानाच स्टेनचा त्याचा अडसर दूर केला. रवींद्र जडेजाला भोपळाही फोडता आला नाही. झहीर खानही स्टेनच्या भेदक माऱ्याची शिकार ठरला. इशांत शर्माला केवळ ४ धावांवर तंबूत धाडत स्टेनने सहाव्या बळीची नोंद केली. मोहम्मद शामीला ग्रॅमी स्मिथच्या हाती झेल देण्यास भाग पाडत मॉर्केलने भारताचा डाव संपुष्टात आणला. अजिंक्य रहाणेने चिवट खेळाचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळी साकारली. त्याने १२१ चेंडूत ८ चौकारांसह ५१ धावांची खेळी साकारली. डेल स्टेनने १०० धावांत ६ बळी टिपले. ३ बळी घेत मॉर्केलने त्याला चांगली साथ दिली.  भारतीय धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ग्रॅमी स्मिथ आणि पीटरसन यांनी ८२ धावांची सलामी देत चांगली सलामी दिली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा स्मिथ ३५ तर पीटरसन ४६ धावांवर खेळत आहेत. आफ्रिकेचा संघ अजून २५२ धावांनी पिछाडीवर आहे.
धावफलक
भारत (पहिला डाव) : शिखर धवन झे. पीटरसन गो. मॉर्केल २९, मुरली विजय झे. डी व्हिलियर्स गो. स्टेन ९७, चेतेश्वर पुजारा झे. डी व्हिलियर्स गो. स्टेन ७०, विराट कोहली झे. डी व्हिलियर्स गो. मॉर्केल ४६, रोहित शर्मा त्रि. गो. स्टेन ०, अजिंक्य रहाणे नाबाद ५१, महेंद्रसिंग धोनी झे. स्मिथ गो. स्टेन २४, रवींद्र जडेजा झे. कॅलिस गो. डय़ुमिनी ०, झहीर खान झे. डी व्हिलियर्स गो. स्टेन ०, इशांत शर्मा झे. डी व्हिलियर्स गो. स्टेन ४, मोहम्मद शामी झे. स्मिथ गो. मॉर्केल १, अवातंर : १२ (लेगबाइज-७, वाइड-४, नोबॉल-१), एकूण : १११.३ षटकांत सर्वबाद ३३४.
बादक्रम : १-४१, २-१९८, ३-१९९, ४-१९९, ५-२६५, ६-३२०, ७-३२१, ८-३२२, ९-३३०, १०-३३४.
गोलंदाजी : डेल स्टेन ३०-९-१००-६, व्हरनॉन फिलँडर २१-६-५६-०, मॉर्ने मॉर्केल २३.३-६-५०-३, जॅक कॅलिस ११-१-३६-०, रॉबिन पीटरसन २२-२-७५-०, जेपी. डय़ुमिनी ४-०-१०-१.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ग्रॅमी स्मिथ खेळत आहे ३५, अल्विरो पीटरसन खेळत आहे ४६, अवांतर : १ (लेगबाइज-१), एकूण : २० षटकांत बिनबाद ८२.
गोलंदाजी : झहीर खान ४-०-२०-०, मोहम्मद शामी ५-०-२३-०, इशांत शर्मा ६-२-१८-०, रवींद्र जडेजा ५-१-२०-०.    
कॅलिसचा झेलांचा विक्रम
शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या जॅक कॅलिसने रवींद्र जडेजाचा झेल टिपत कारकिर्दीतील २००व्या झेलाची नोंद केली. जेपी डय़ुमिनीच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये कॅलिसने हा झेल टिपला. या झेलासह कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत द्रविडला मागे टाकत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.