ब्रेकिंगला ऑलिम्पिक दर्जा मिळाल्याबद्दल नृत्य क्षेत्रातून स्वागत

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ब्रेकिंग या नृत्य प्रकारास क्रीडा स्पर्धेचा दर्जा दिल्याने नृत्य क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वप्रथम एका नृत्य प्रकाराचा समावेश केल्याने जगभरात ब्रेकिंगचा प्रचार आणि प्रसार तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी प्रतिक्रिया नृत्य दिग्दर्शकांकडून व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ७ डिसेंबर २०२० रोजी ‘ब्रेकिंग’ नृत्य प्रकाराचा २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये समावेश केला. तरुणांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे.

‘‘चित्रपटातील गाणी, रिअ‍ॅलिटी शो, तसेच अंडरग्राऊंड बॅटलपर्यंत मर्यादित असणाऱ्या ब्रेकिंग या नृत्य प्रकारास आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होईल तसेच व्यासपीठही मिळेल. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणाऱ्या बी बॉईज आणि बी गर्ल्सना नृत्य संस्था, तसेच सरकारी नोकरीत स्थान मिळेल. तसेच नृत्यात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल,’’ अशी प्रतिक्रिया ‘यूडीके’ नृत्यसमूहाच्या पारितोष परमार यांनी व्यक्त केली.

‘‘ब्रेकिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून याला आर्थिक पाठबळही मिळेल. या नृत्य प्रकारास मिळणारा प्रतिसाद पाहून अधिक स्पर्धाचे आयोजन, तसेच प्रायोजकत्वही मिळण्यास मदत होईल,’’ असे ‘रोहन एन’ ग्रुपच्या रोहन रोकडेने सांगितले.

‘‘ब्रेकिंगच्या नृत्य स्पर्धामध्ये जगभरात परीक्षण तसेच गुणांकनाची पद्धत लागू होईल. काही वर्षांनतर देशात याचे व्यवस्थापन करणारी संघटना अस्तित्वात येईल. सध्या मुंबईत हा नृत्य प्रकार शिकवणाऱ्या कमी नृत्यसंस्था अस्तित्वात आहेत. पुढे याची संख्याही वाढेल,’’ असे मत नृत्य दिग्दर्शक सॅड्रिक डिसूझाने व्यक्त केले.

 

ब्रेकिंगला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा मिळाल्याने काय होईल?

* देशात या नृत्य प्रकाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल.

* नृत्य दिग्दर्शकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण होईल.

* इतर क्रीडा प्रकाराप्रमाणे या नृत्य प्रकारास सरकारी सोयीसुविधा तसेच आर्थिक पाठबळ मिळेल.

* या नृत्य प्रकाराचे स्पर्धाचे परीक्षण, गुणांकन यात एकसंधता आणि सुसूत्रता येण्यास मदत मिळेल.

हिंदी चित्रपटसृष्टीलाही ब्रेकिंगची भुरळ

अमेरिकेतील ब्रेकिंग हा नृत्य प्रकार तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीचाही मोठय़ा प्रमाणावर वाटा आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांनी आपल्या गाण्यात या नृत्याचा समावेश केला. त्यानंतर अभिनेता जावेद जाफरी आणि प्रभुदेवाने बॉलीवूडचा तडका दिला. ‘बुगी वुगी’, ‘डान्स इंडिया डान्स’, मराठीत ‘एकापेक्षा एक’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमांमुळे ब्रेकिंग सर्वसामान्य लोकांना माहीत झाले. मुंबईतील ‘रोहन एन ग्रुप’, ‘फिक्टिशियस’, ‘किंग्स युनायटेड’, ‘यूडीके’, ‘फ्रीक अँण्ड स्टाईल’, ‘ब्रेक गुरूज’ या नृत्यसमूहांनी आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धामध्ये सहभागी होत हिप हॉप, बी – बॉईंग हे नृत्य प्रकार लोकांसमोर आणले.

ब्रेकिंगचा उदय कसा झाला?

शारीरिक चपळता, तसेच नृत्य कौशल्याचा कस पाहणारा हा नृत्य प्रकार ‘ब्रेकिंग’ या नावाने प्रसिद्ध आहे. या नृत्य प्रकाराचा उगम १९७० मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. सत्तरच्या दशकातील आर्थिक हलाखी, गौरवर्णीयांकडून होणारा अन्याय यावर व्यक्त होण्यासाठी अमेरिके तील कृष्णवर्णीयांसाठी हिप हॉप हे व्यक्त होण्याचे माध्यम होते. ब्रेकिंग म्हणजे तोडणे अथवा थांबणे. संगीताच्या तालावर मध्येच थांबून केलेल्या नृत्यास ब्रेकिंग म्हटले जाते. ब्रेकिंगचा समावेश हिप हॉप या नृत्य प्रकारात केला जातो. ब्रेकिंग हा नृत्य प्रकार करणाऱ्या तरुणांना ‘बी बॉईज’ अथवा ‘बी गर्ल्स’ असे म्हटले जाते. ब्रेकिंगमध्ये ‘टॉप रॉकिंग’, ‘डाऊन रॉक’, ‘पॉवर मूव्हज’ आणि ‘फ्रिझेस’ या चार मुख्य गोष्टी आहेत. ऑलिंपिक समितीच्या या निर्णयामुळे ब्रेकिंगचा प्रचार आणि प्रसार होईल तसेच नृत्य दिग्दर्शकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.