मागच्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकादरम्यान भारतीय महिला संघाला अंतिम फेरी गाठून दिल्यानंतर, मिताली राजचं नाव प्रत्येक भारतीयाच्या ओठावर येण्यास सुरुवात झाली. भारतीय संघाच्या या माजी कर्णधार खेळाडूची अनेकदा सचिन तेंडुलकरशीही तुलना झाली. क्रिकेटच्या मैदानात भारताचं नाव मोठं करणाऱ्या मितालीला मात्र लहानपणी क्रिकेट खेळायचंच नव्हतं, तिची खरी आवड होती नृत्य. केवळ वडिलांच्या इच्छेखातर मी क्रिकेट खेळायला लागल्याचं मिताली राजने नुकतचं Breakfast with Champion या कार्यक्रमात सांगितलं आहे.

निवेदक गौरव कपूरसोबत बोलत असताना मितालीने आपल्या बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला. “क्रिकेट खेळायला लागण्याच्या आधीपासूनच मी नृत्य शिकत होते. मला मोठं होऊन नृत्यातच करियर करण्याची इच्छा होती. माझ्या आईलाही मी नृत्यातं मोठं नाव कमवावं असं वाटत होतं, मात्र केवळ वडिलांच्या इच्छेखातर मी क्रिकेटमध्ये आले.” मितालीने आपल्या बालपणातलं गुपित उघड केलं.

इतर महिला क्रिकेटपटूंप्रमाणे मलाही सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मध्यमवर्गीय दाक्षिणात्य परिवारातली एक मुलगी मुलांसोबत क्रिकेट खेळणार हेच अनेकांना पटलं नव्हतं. मात्र माझ्या वडिलांनी कशाचीही पर्वा न करता मला क्रिकेट शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या पाठींब्यामुळेच मी आज इतका मोठा पल्ला गाठू शकत असल्याचंही मिताली म्हणाली. सध्या भारतीय संघाचं नेतृत्व हे हरमनप्रीत कौरकडे आहे, मात्र आजही मिताली ही भारतीय महिला संघाचा महत्वाचा घटक मानली जाते.