राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्य पदकाची कमाई करत आठव्या दिवशी भारताला कुस्तीत पहिलं पदक मिळवून दिलं. मात्र आपल्या मुलीचा हा खेळ आणि पदक स्विकारताना पाहणं तिचे वडील महावीर सिंह फोगट यांच्या नशिबी नव्हतं. तिकीट न मिळाल्याने महावीर फोगट यांना मैदानात प्रवेश घेता आला नाही. या प्रसंगामुळे अनेकांना दंगल चित्रपटातल्या अखेरच्या क्षणांमधल्या प्रसंगाची आठवण झाली.

“बाबा पहिल्यांदा परदेशात माझा कुस्तीचा सामना पाहायला आले होते. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे त्यांना माझा सामना आणि पदक घेताना पाहता आलं नाही. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी दोन तिकीटं देण्यात आली होती. बाबांना तिकीट मिळावं यासाठी मी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना मैदानात प्रवेश करता आलाच नाही. सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे त्यांना माझा सामना टेलिव्हीजन सेटवरही पाहता आला नाही.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बबिता फोगटने आपली नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भात बबिताने भारतीय पथकाचे प्रमुख विक्रम सिसोदीया यांनाही गळ घातली. मात्र त्यांनीही या प्रकरणात आपली असमर्थता दर्शवल्याचं, बबिताने सांगितलं. “आम्हाला आयोजन समितीकडून प्रत्येक खेळाडूकरता दोन तिकीटं मिळाली होती. मात्र बबितासोबत असणाऱ्या प्रशिक्षकांना ही तिकीटं देण्यात आल्यामुळे महावीर फोगट यांना तिकीटं देता आली नाही. ज्या वेळा बबिताने माझ्याकडे तिकीटांचा विषय काढला त्यावेळी ती मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं”, असं म्हणतं सिसोदीया यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

याआधीही बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आई-वडिलांना तिकीटं न मिळाल्यामुळे आपली नाराजी व्यक्त केली होती. अखेर सामना संपल्यानंतर बबिताने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विनंती करत, त्यांच्या पासवर महादेव फोगट यांना मैदानात आणलं. मात्र घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचं बबिताने पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं.