न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजीचा हुकमी एक्का, उपयुक्त फलंदाज आणि सभ्य माणूस अशी खेळाला साजेशी प्रतिमा राखणाऱ्या डॅनियल व्हेटोरीने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय अखेर जाहीर केला. न्यूझीलंडकडून तब्बल १८ वर्षे क्रिकेटची अविरत सेवा करणाऱ्या व्हेटोरीने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करताना ‘मला न्यूझीलंड संघाचा अभिमान वाटतो’ असे मत व्यक्त केले. व्हेटोरीने यापूर्वीच कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटला रामराम ठोकला होता.
यंदाचा विश्वचषक व्हेटोरीसाठीच जिंकायचा, हे संघाने ठरवले होते. त्यानुसार त्यांनी कामगिरीही केली, पण विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले आणि विश्वविजयानिशी आपल्या लाडक्या व्हेटोरीला अलविदा करायचे न्यूझीलंडचे स्वप्न भंग पावले. ऑस्ट्रेलियातून मायदेशात दाखल झाल्यावर अखेर व्हेटोरीने एकदिवसीय क्रिकेट सोडण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
‘‘विश्वचषकातील अंतिम फेरी हा माझ्यासाठी अखेरचा एकदिवसीय सामना होता. कारकीर्दीचा शेवट मला चांगल्या पद्धतीने आणि मोठय़ा स्पर्धेत करता आला याचा आनंद आहे. विश्वचषक जिंकणे ही फार मोठी गोष्ट होती, आम्हाला विश्वचषक जिंकता आला नसला, तरी मला न्यूझीलंडच्या संघाचा अभिमान वाटतो. गेल्या सहा आठवडय़ांमध्ये आम्ही दमदार कामगिरी केली. साखळी आणि बाद फेरीतील दोन सामने जिंकत आम्ही अंतिम फेरी गाठली. ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे,’’ असे व्हेटोरी म्हणाला. व्हेटोरीने वयाच्या १८व्या वर्षी न्यूझीलंडकडून १९९७ साली पदार्पण केले. न्यूझीलंडकडून सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.  काही महिन्यांपूर्वी व्हेटोरीला दुखापतीने ग्रासले होते. पण यामधून सावरत त्याने संघात पुनरागमन केले आणि संघातील सहकाऱ्यांनीही त्याला चांगला पाठिंबा दिला.