करोना विषाणूचा सामना करताना, सध्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. सामने रद्द झाल्यामुळे आयसीसीशी संलग्न असलेल्या बहुतांश देशांना आर्थिक फटका बसत आहे. अनेक क्रिकेट बोर्डांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं असून काही क्रिकेट बोर्ड खेळाडूंच्या मानधनातही कपात करण्याचा विचार करत आहे. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या बीसीसीआयलाही या परिस्थितीचा फटका बसलाय. सध्याच्या परिस्थितीत बांगलादेश क्रिकेट संघाचा स्पिन बॉलिंग प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरीने एक नवीन आदर्श घालून दिला आहे. व्हिटोरीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या इतर अधिकाऱ्यांसाठी आपल्या मानधनातली काही रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट बोर्डात जे कर्मचारी खालच्या पातळीवर काम करतात, त्यांच्या पगारासाठी मानधनातली काही रक्कम दान देण्याचं व्हिटोरीने मान्य केलं आहे. यासंदर्भात त्याने बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा केल्याचं, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांना ढाका येथील Prothom Alo या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. मात्र व्हिटोरीने किती रक्कम दान केली आहे हे सांगण्यास चौधरी यांनी नकार दिला आहे.

ESPNCricinfo च्या माहितीनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डात प्रशिक्षण वर्गात अडीच लाख अमेरिकन डॉलर्स हे सर्वाधिक मानधन आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एका विशेष निधीची तरतूद केल्याचंही समजतंय. सध्या करोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. सामने रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसी पुन्हा सामने सुरु करता येतील का याचा विचार करत आहे. तोपर्यंत क्रिकेट प्रेमींना आपले आवडते खेळाडू परत मैदानात कधी उतरतात याची वाट पहावी लागणार आहे.