भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भविष्यात समालोचन करण्यापेक्षा कोचिंगला प्राधान्य देईल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने व्यक्त केला आहे. धोनी त्याच्या दुसर्‍या इनिंगसाठी काय निवडेल असे कनेरियाला त्याच्या यूट्यूब चॅनलवर विचारण्यात आले. तेव्हा त्याने हे उत्तर दिले.

कनेरियाने आपल्या या प्रतिक्रियेमागील कारण स्पष्ट केले नाही. परंतु भविष्यात धोनी काय निवडेल यावर आत्मविश्वास व्यक्त केला. तो म्हणाला, ”मला वाटते, की समालोचनापेक्षा धोनी कोचिंगला प्राधान्य देईल. मला खात्री आहे, की एमएस धोनी लवकरच कोचिंगच्या जगात प्रवेश करेल आणि त्या क्षेत्रात नवीन करिअरची सुरूवात करेल.”

धोनीने ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना खेळला होता. या सामन्यात भारताचा पराभव झाला. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात धोनी चांगल्या लयीत दिसला. बायो बबलमध्ये करोनाची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आयपीएल अर्ध्याचत स्थगित करण्यात आले. स्पर्धा स्थगित झाली, तेव्हा धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता.

हेही वाचा – TOKYO 2020 : नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीमध्ये भारताची निराशा

धोनीची कामगिरी

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जला तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्याने चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.