31 May 2020

News Flash

‘हिच योग्य वेळ’, डॅरेन लेहमन यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा

ऑस्ट्रेलियाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच वेळ

बॉल टॅम्परिंग स्कॅण्डलमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ माजली असून ऑस्ट्रेलिया क्रिकेटला अजून एक मोठा धक्का बसला आहे. डॅरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला असून दक्षिण आफ्रिकेविरोधातील चौथा आणि अंतिम कसोटी सामना हा त्यांचा अखेरचा सामना असेल. विशेष म्हणजे बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्लीन चिट मिळालेली असतानाही त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच वेळ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.

एक वर्षाची बंदी घालण्यात आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ भावूक झाला होता. त्याला भावूक झाल्याचं पाहिल्यानंतरच आपण हा निर्णय घेतल्याचं डॅरेन लेहमन यांनी सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी हा दुहेरी धक्का आहे. एकीकडे नव्या कर्णधाराची जबाबदारी असताना आता त्यांना अशा प्रशिक्षकाचा शोध घ्यायचा आहे जो त्यांना वर्ल्ड कपच्या आधी तयार करु शकेल.

खेळाडूंना गुड बाय म्हणणं सर्वात कठीण काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्यावर कोणताच दबाव नव्हता आणि हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

स्टीव्ह स्मिथनं मागितली माफी
दरम्यान याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथनं पत्रकार परिषदेत सगळ्या क्रीडाप्रेमींची माफी मागितली. बोलताना भावना अनावर झाल्याने डोळ्यातून अनेकवेळा त्याच्या पाणी आलं आणि आपण भयंकर मोठी चूक केल्याचं त्यानं मान्य केलं. कर्णधार म्हणून आपण चुकीचा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. माझं क्रिकेटवर प्रेम असून यातून बाहेर पडू असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

जर या प्रकरणापासून इतर खेळाडूंनी बोध घेतला तर या प्रकरणातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं असं म्हणता येईल असं तो म्हणाला. उर्वरीत आयुष्यभर ही चूक विसरणार नाही असंही त्यानं म्हटलं आहे. जसा काळ जाईल त्याप्रमाणे मला लोकांचं प्रेम आणि आदर परत मिळेल अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली आहे.

क्रिकेट हा जगातला सर्वोत्कृष्ट खेळ असून ते माझं सर्वस्व आहे. माझं आयुष्यच क्रिकेट असून अपेक्षा आहे की पुन्हा मी क्रिकेटचा भाग होईल असं त्यानं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ही घटना म्हणजे माझ्या नेतृत्वाचाच पराभव असल्याचं स्मिथनं डबडबत्या नयनांनी कबूल केलं आहे. दक्षिण अफ्रिकेतून मायदेशात परतल्यानंतर सिडनीमध्ये त्यानं पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2018 6:01 pm

Web Title: darren lehmann announces he will step down as head coach
Next Stories
1 भारतीय महिलांची इंग्लंडवर ८ गडी राखून मात, महाराष्ट्राच्या स्मृती मंधाना, अनुजा पाटील चमकल्या
2 माझ्या कृत्याने आई-वडिलांना नाहक त्रास, पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथला रडू अनावर
3 अश्रूभरल्या डोळ्यांनी स्टीव्ह स्मिथनं मागितली माफी
Just Now!
X