19 February 2019

News Flash

डॅरेन लेहमन ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

बॉल टॅम्परिंगच्या वादामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ

बॉल टॅम्परिंगच्या वादामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ माजली असून डॅरेन लेहमनला ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार  करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात चौथा कसोटी सामना सुरु होण्याआधीच डॅरेन लेहमनने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. टेलिग्राफने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कर्णधार स्टिव्ह स्मिथने वरिष्ठ खेळाडूंसोबत मिळून ओपनिंग फलंदाज कॅमरून बेनक्राफ्टकडून बॉल टॅम्परिंग करण्याची रणनीती आखल्याची कबुली दिली होती. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात हा प्रकार घडला होता. यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये खळबळ माजली असून खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे.

दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरून बेनक्राफ्टने एका पिवळसर वस्तूला घासून चेंडू कुरतडला. टेलिव्हिजन चित्रीकरणात ही बाब स्पष्टपणे दिसली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने बॉल टॅम्परिंग ही आमची रणनीतीच होती असे मान्य केले. कर्णधार स्टिव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असं मान्य केलं.

स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर काहीवेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला. याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी ही घटना आश्चर्यजनक आणि निराश करणारी म्हटलं. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या वृत्तांमुळे आम्ही सर्वच निराश झालो, आमचा संघ खोटारडेपणा करू शकतो या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. संपूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे, असं ते म्हणाले होते.

बॉल टॅम्परिंगमध्ये कॅमेरून बेनक्रॉफ्ट दोषी आढळल्यानंतर आयसीसीने कर्णधार स्मिथला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित केले. इतकेच नाही तर या कृतीला समर्थन देण्यासाठी त्याला मॅच फी इतकाच म्हणजेच १०० टक्के दंडही ठोठावण्यात आला. पण अनेक माजी क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या या निर्णयावर टीका करत याहून कठोर कारवाई करायला हवी होती अशी मागणी केलीये. क्रिकेटविश्वातूनच नव्हे तर खुद्द ऑस्ट्रेलियामध्येही क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत असून दोषी खेळाडूंवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे. दोषी खेळाडूंवर आजीवन बंदीची कारवाई होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on March 27, 2018 11:41 am

Web Title: darren lehmann may resign as australia coach