अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं. ख्रिस गेलने, फुटबॉलमध्ये नाही तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो असं विधान केलं होतं. तर सॅमीने आयसीसीला या विरोधात भूमिका घेण्याचं आवाहन केलं. सॅमी आणि ख्रिस गेल यांनी आपल्याला खेळत असताना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचं जाहीर केलं. यानंतर डॅरेन सॅमीने आयपीएलमध्ये SRH संघाकडून खेळत असतानाही आपल्यावर वर्णद्वेषी टोमणे सहन करावे लागले असं म्हटलं आहे.

“मी आयपीएलमध्ये SRH कडून खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेराला संघात काळू नावाने बोलावलं जायचं. मला वाटलं हा कुठलातरी चांगला शब्द असेल.” हे समजल्यावर मला आणखीनच दुःख झाल्याचं सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे.

याआधीही सॅमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फ्लॉयड यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना कसा करावा लागतो याबद्दल माहिती दिली होती. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडचा नवोदीत अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे. जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवरही अमेरिकेत संताप व्यक्त होतो आहे.