जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीला अमेरिकेत पोलिस कस्टडीमध्ये प्राण गमवावे लागले. जॉर्जच्या मानेवर पाय ठेवून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या प्रकारानंतर अमेरिकेत सध्या चांगलंच संतापाचं वातावरण आहे. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी अनेक कृष्णवर्णीय नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. जागतिक पातळीवर या घटनेचा निषेध होत असताना आता क्रिकेटपटूंनीही वर्णद्वेषाविरोधात आपलं मत मांडण्यास सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने क्रिकेटविश्वाला अशा घटनांवर व्यक्त होण्याची विनंती केली आहे.

सध्याच्या घडीला जर क्रिकेट विश्वाने याविरोधात आवाज उठवला नाहीत, तर तुम्हीही या समस्येचा भाग बनला आहात असं वाटेल. या आशयाचा संदेश सॅमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहीला आहे.

माझ्यासारख्या अनेक कृष्णवर्णीय खेळाडूंसोबत काय अन्याय होतो हे आयसीसी आणि क्रिकेट बोर्डाला दिसत नाही का?? अशा घटनांविरोधात आयसीसीने आवाज उठवायला हवा असंही परखड मत सॅमीने मांडलं आहे.

क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडचा नवोदीत अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे. जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवरही अमेरिकेत संताप व्यक्त होतो आहे.