भारत दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या १५ सदस्यीय संघात किर्क एडवर्ड्स आणि यष्टिरक्षक-फलंदाज चाडविक वॉल्टन यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या वेस्ट इंडिज ‘अ’ संघ भारतात अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यात एडवर्ड्सने आपल्या दमदार कामगिरीनिशी लक्ष वेधून घेतले आहे. वेस्ट इंडिज आणि भारत मालिकेतील दुसरी कसोटी ही सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील २००वी कसोटी ठरणार आहे.
२०११मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या एडवर्ड्सने पदार्पणात कसोटी शतक झळकावण्याचा मान संपादन केला होता. पदार्पणात शतक झळकावणारा तो विंडीजचा १४वा खेळाडू ठरला होता.
वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. पहिली कसोटी ६ नोव्हेंबरपासून तर दुसरी कसोटी १४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. याशिवाय अनुक्रमे २१, २४ आणि २७ नोव्हेंबर या दिवशी एकदिवसीय सामने होणार आहेत.
वेस्ट इंडिजचा संघ : डॅरेन सॅमी (कर्णधार), टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, शिवनारायण चंदरपॉल, शिल्डॉन कॉटररेल, नरसिंग देवनरिन, किर्क एडवर्ड्स, ख्रिस गेल, वीरासॅमी परमॉल, किरान पॉवेल, दिनेश रामदिन, केमार रॉच, मार्लन सॅम्युअल्स, शेन शिलिंगफोर्ड आणि चॅडविक वॉल्टन.