कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीप्रकरणी पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी भारताचा आघाडीचा नौकानयनपटू दत्तू भोकनळने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २ ऑगस्टला ऑस्ट्रियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याच्या दृष्टीने हा गुन्हा रद्द होणे महत्त्वाचे असल्याचा दावा त्याने केला आहे. न्यायालयानेही त्याच्या याचिकेवर बुधवारी तातडीने सुनावणी ठेवली आहे.

न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी त्याच्या वतीने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भोकनळविरोधात पत्नीने नाशिक पोलिसांत कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीची तक्रार केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१८ या काळात भोकनळने आपला प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याने आपल्यासोबत हिंदू वैदिक पद्धतीने विवाह केला आहे. त्यानंतर कायदेशीर पद्धतीने लग्न करण्याचे दोन वेळा आश्वासनही दिले, असे भोकनळच्या पत्नीने म्हटले आहे. ती स्वत: नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. भारतीय सेना दलात कार्यरत असलेला भोकनळ हा २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय नौकानयनपटू ठरला होता.