क्रिकेटमध्ये सतत व्यग्र असताना माझ्यात एक वडीलसुद्धा जिवंत आहे याचा मला कधी विसर पडला तरी, माझी मुलगी जिवा मला त्याची नेहमी जाणीव करून देते. किंबहुना तिनेच मला एक उत्तम व्यक्ती म्हणून नावारुपास आणले, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिली.

आपल्या मिडास स्पर्शासाठी प्रसिद्ध असलेल्या ३७ वर्षीय धोनीने नुकताच चेन्नई सुपर किंग्ज संघाला इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कौटुंबिक विषयावर जास्त भाष्य न करणारा धोनी या वेळी मन मोकळे करून बोलत होता.

धोनी म्हणाला, ‘‘कोणतीही मुलगी आपल्या वडिलांशी नेहमीच जवळची असते. एक क्रिकेटर म्हणून नसले तरी एक माणूस म्हणून जिवाने मला नक्कीच सुधारले आहे. ती जेव्हा जन्माला आली तेव्हा मी तिच्यासोबत नव्हतो. बहुतेक वेळा मी क्रिकेटमध्ये व्यस्त असायचो. घरीही क्रिकेटविषयी चर्चा चालू असताना माझ्यावर हाताला जे सापडेल त्याचा भडिमार व्हायचा.’’

‘‘तिच्यासोबत वेळ घालवताना मला स्वत:चा विसर पडतो. यंदा आयपीएलमध्ये ती प्रत्येक सामन्याला उपस्थित होती. त्यामुळे मला एक वेगळीच शक्ती मिळायची,’’ असे धोनी म्हणाला.