खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

मुंबई : सातारा येथील भाजीविक्रेते संतोष पवार यांची कन्या वैष्णवीने सोमवारी वेटलिफ्टिंगममध्ये सोनेरी यश मिळवले. ८१ किलो गटात तिने स्नॅचमध्ये ५४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ६४ किलो असे एकूण ११४ किलो वजन उचलले.

वैष्णवी ही सातारा येथील अनंत इंग्लिश प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत आहे. आपल्या यशाबाबत ती म्हणाली, ‘‘पाचव्या इयत्तेत शिकत असताना मला या खेळाची आवड निर्माण झाली. देवकर यांनी मला या खेळाचे बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी या खेळाच्या स्पर्धाचे निरीक्षण केले. देवकर यांच्या मार्गदर्शनाचा व माझ्या आई-वडिलांचे संपूर्ण सहकार्य याचा माझ्या सुवर्णपदकात मोठा वाटा आहे. शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मला येथे फायदा झाला. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे व हे ध्येय साकार करण्यासाठी मी कसोशीने कष्ट करणार आहे.’’

वैष्णवी हिचे सोनेरी यश पाहण्यासाठी तिचे आई-वडील उपस्थित होते. तिचे वडील संतोष यांनी सांगितले की, ‘‘वैष्णवी ही खूप मेहनती खेळाडू आहे. या खेळासाठी लागणाऱ्या आहाराचा खर्च भाजी विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नातूनच करीत आहे. तिच्याकडे निश्चित गुणवत्ता आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशास पदक मिळवून देईल अशी मला खात्री आहे.’’

कबड्डीमध्ये संमिश्र यश

महाराष्ट्राला कबड्डीमधील मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. २१ वर्षांखालील मुलींमध्ये महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ३३-२७ असा पराभव केला, तर १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राला उत्तर प्रदेशकडून ३०-३१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. बंगालविरुद्ध महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी, सृष्टी चाळके व आसावरी कचरे यांनी जिद्दीने खेळ केला. पूर्वार्ध संपण्यास ३० सेकंद बाकी असताना सोनालीने लोण नोंदवण्याच्या दोन गुणांसह चार गुण मिळवत महाराष्ट्राला निर्णायक आघाडी घेतली. हीच आघाडी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली. उत्तर प्रदेशविरुद्ध सामन्यात शेवटचे एक मिनिट बाकी असताना उत्तर प्रदेशकडे ३०-२८ अशी आघाडी होती. महाराष्ट्राने दोन गुण नोंदवत ३०-३० अशी बरोबरी साधली. सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पंचांनी उत्तर प्रदेशला एक तांत्रिक गुण दिला. त्यामुळे त्यांचा संघ विजयी झाला.

जलतरणात केनिशा व अपेक्षा यांचे सोनेरी यश

महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नाडिस यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. रौप्यपदक मिळवणाऱ्या खेळांडूमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा बुचडे, रुद्राक्ष मिश्रा, शेरॉन साजू यांचा समावेश आहे, तर साहिल पवार, साध्वी धुरी यांनी कांस्यपदक मिळवले. अपेक्षाने १७ वर्षांखालील मुलींच्या २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीचे सुवर्णपदक मिळवताना हे अंतर २ मिनिटे २७.५४ सेकंदात पार केले. याच वयोगटातील ५० मीटर्स फ्रीस्टाइल शर्यत केनिशाने २७.२८ सेकंदांत जिंकली.