पुढील महिन्यात लीग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान लॉस एंजेलिस गॅलॅक्सी संघाचे अखेरचे प्रतिनिधित्व केल्यानंतर महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम गॅलेक्सीला अलविदा करणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या मेजर लीग सॉकर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आणखी एका महान फुटबॉलपटूच्या कारकीर्दीचा अस्त होणार आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार असलेल्या ३७ वर्षीय बेकहॅमने गेल्या सहा मोसमांत गॅलेक्सी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हॉस्टन डायमानोवर ०-१ असा विजय मिळवून गॅलेक्सीला गेल्या मोसमात एमएलएस चषक जिंकून देण्यात बेकहॅमने मोलाचा वाटा उचलला होता. जानेवारी महिन्यात गॅलेक्सी संघाशी नवा करार करणाऱ्या बेकहॅमने सोमवारी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आता गॅलेक्सीला बेकहॅमच्या तोडीच्या फुटबॉलपटूचा शोध घ्यावा लागणार आहे. २००७मध्ये रिअल माद्रिदकडून गॅलेक्सीत दाखल झाल्यानंतर साडेपाच वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्तीपूर्वी आपण आणखी एका आव्हानाला सामोरे जाणार आहोत, याचे संकेत बेकहॅमने दिले आहेत.
कारकीर्दीच्या उत्तरार्धात अनेक दुखापतींना सामोरे जावे लागल्यामुळे बेकहॅमला महत्त्वाच्या सामन्यांना मुकावे लागले होते. त्यामुळे युरोपमधील कोणता बलाढय़ संघ बेकहॅमला करारबद्ध करतोय, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ‘‘गॅलेक्सीबरोबरचा माझा हा शेवटचा सामना असणार आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्यापूर्वी मी आणखी एका आव्हानाला सामोरा जाईन. एमएलएस चषक स्पर्धेशी माझे नाते इथेच संपणार नाही.
भविष्यात मी एखाद्या संघाचा मालक बनण्याचा विचार करत आहे,’’ असे बेकहॅमने सांगितले. मात्र अखेरचे आव्हान कोणते असेल, याबाबत सांगण्यास बेकहॅमने नकार दिला.