मध्य अंतराच्या शर्यतींमध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या केनियाने पुरुषांच्या ८०० मीटर धावणे व ४०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये सोनेरी कामगिरी करीत जागतिक मैदानी स्पर्धेत दुहेरी धमाका साजरा केला.
केनियाच्या डेव्हिड रुदीशाने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. त्याने हे अंतर एक मिनिट ४५.५४ सेकंदांत पार केले. पोलंडच्या अ‍ॅडम किझेझोटने ही शर्यत एक मिनिट ४६.०८ सेकंदांत पूर्ण करीत रौप्यपदक मिळवले. बोस्नियाच्या अ‍ॅमेल टय़ुकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने हे अंतर एक मिनिट ४६.३० सेकंदात पूर्ण केले. ४०० मीटर अडथळ्याची शर्यत केनियाच्या निकोलस बेट्टने ४७.७९ सेकंदांत जिंकली. रशियाच्या डेनिस कुद्रीयात्सोवला रौप्यपदक मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास ४८.०५ सेकंद वेळ लागला. बहामासच्या जेफ्री गिब्सनने ४८.१७ सेकंदांसह कांस्यपदकाची कमाई केली.
पुरुषांच्या लांब उडीत इंग्लंडच्या ग्रेग रुदरफोर्डला सोनेरी यश लाभले. त्याने ८.४१ मीटर अंतरापर्यंत उडी मारली. ऑस्ट्रेलियाचा फॅब्रिस लॅपिरीने ८.२४ मीटपर्यंत उडी मारली व रौप्यपदक पटकावले. चीनच्या जियानेन वाँगने कांस्यपदकावर समाधान मानले. त्याने ८.१८ मीटपर्यंत उडी मारली.
महिलांची १५०० मीटर अंतराची शर्यत इथिओपियाच्या गेन्झेबे दिबाबाने जिंकली. ही शर्यत पार करायला तिला ४ मि. ८.०९ सेकंद वेळ लागला. केनियाच्या फॅथ किपयेगोनने रौप्यपदक मिळवताना ही शर्यत ४ मिनिटे ८.९६ सेकंदात पूर्ण केली. नेदरलँड्सच्या सिफान हसनला कांस्यपदक मिळाले. तिने ही शर्यत चार मिनिटे ९.३४ सेकंदात पार केली. थाळीफेकीत क्युबाच्या डेनिया कॅबेरिरोला सुवर्णपदक मिळाले. तिने पहिल्याच प्रयत्नात ६९.२८ मीटपर्यंत थाळीफेक केली व तीच तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली. क्रोएशियाच्या सँड्रा पेकरेव्हिकने रौप्यपदक मिळवताना ६७.३९ मीटर अंतरापर्यंत थाळी फेकली. जर्मनीची नेदिनी म्युलरने (६५.५३ मीटर)  कांस्यपदक मिळवले.