ऑस्ट्रेलियाचा अव्वल सलामीवीर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सराव शिबिरासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नरच्या समावेशाविषयी साशंकताच आहे. तिसऱ्या कसोटीसाठी संघनिवड करण्याकरिता निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची चर्चा होणार असून त्यासाठी आपली काहीही करायची तयारी असल्याचे वॉर्नरने स्पष्ट केले. भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वॉर्नरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेला वॉर्नर तिसऱ्या कसोटीत पुनरागमनाविषयी उत्सुक आहे. जो बर्न्‍स आणि मॅथ्यू वेड या सहकाऱ्यांनीही वॉर्नरच्या पुनरागमनाची आशा बाळगलेली नाही. ‘‘शनिवारी आणि रविवारी ऑस्ट्रेलिया संघ सराव करणार आहे. या सराव शिबिरानंतरच माझी तंदुरुस्ती कोणत्या टप्प्यात आली आहे, याची कल्पना येईल. त्यामुळे मी सध्या कोणतेही संकेत देणार नाही. मात्र संघनिवडीविषयी साशंकताच आहे,’’ असे वॉर्नरने दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनमध्ये अफाट गुणवत्ता असली तरी कसोटी क्रिकेटमध्येही तो यशस्वी होईल की नाही, यासंबंधी साशंकता वाटते, असे मतही वॉर्नरने व्यक्त केले. ‘‘नटराजन हा फार प्रतिभावान गोलंदाज आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने एकाच टप्प्यावर मारा करण्यात तो यशस्वी होण्याची चिन्हे कमी दिसतात. त्यामुळे कसोटीपेक्षा एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मध्येच भारताने त्याचा वापर करावा,’’ असे वॉर्नर म्हणाला.