पुण्यातील कसोटीत भारतीय संघावर मात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण आत्मविश्वासाने दुसऱया कसोटीला सामोरे जाण्यास सज्ज झाला आहे. पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपुष्टात आल्याने दुसऱया कसोटीसाठी खेळाडूंकडे अधिकचा वेळ मिळाला. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काही वेळ क्रिकेट व्यतिरिक्त कामांसाठी देखील दिला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ व्यतित केला.

डेव्हिड वॉर्नरला चाहत्यांनी भरमसाट प्रश्न विचारले आणि वॉर्नरने त्याची दिलखुलास उत्तरं देखील दिली. चाहत्यांनी वॉर्नरला त्याचा आवडता भारतीय फलंदाज कोण याबाबतही विचारले. त्यावर वॉर्नरने केएल राहुलचे नाव घेतले, तर गोलंदाजीच्या बाबतीत वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला पसंती दिली. त्यानंतर कोहलीबद्दल एका शब्दात काय सांगशील? असं विचारलं असता वॉर्नरने कोहली ‘जीनिअस’ असल्याचे म्हटले. यासोबतच वॉर्नरने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेही कौतुक केले. धोनी लाजवाब क्रिकेटपटू असल्याचे मत वॉर्नरने व्यक्त केले.
दरम्यान, बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना शनिवारपासून खेळविण्यात येणार असून दोन्ही संघ यासाठी पूर्णपणे सज्जे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.