ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाज रोहित शर्माशी हुज्जत घालणे महागात पडले आहे. रोहित शर्माशी विनाकारण हुज्जत घातल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरच्या मानधनातून ५० टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत रविवारी यजमान ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचा रोमांचक सामना झाला. सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने विनाकारण रोहित शर्माला डिवचलं. सामन्याच्या २३ वे षटक संपल्यानंतर रोहित आणि रैना खेळपट्टीच्या मध्यावर येऊन बोलत होते. या षटकाच्या शेवटच्या चेंडुवर दोघांनी ‘ओव्हर-थ्रो’ची एक धाव घेतली होती. चेंडू फलंदाजाला लागून गेला असूनही रोहित-रैनाने धाव घेतल्याने डेव्हिड वॉर्नरला खटकले आणि रोहितला सुनावण्यासाठी वॉर्नर त्याच्याजवळ पोहोचला. दरम्यान, रोहित आणि रैना हिंदीत बोलत होते. तितक्यात वॉर्नरने जवळ येऊन काहीतरी टिप्पणी केल्याने रोहितचे लक्ष त्याच्याकडे गेले. रोहित प्रत्युत्तर देणार इतक्यात वॉर्नर खवळला आणि रोहितला इंग्रजीत बोलण्याचे खडसावून सांगू लागला. वाद आणखी वाढण्याआधीच पंचांनी हस्तक्षेप करून दोघांनाही समज दिली आणि वाद मिटला.
दरम्यान, रोहीत आणि रैना हिंदीमध्ये आपल्याला उद्देशून काहीतरी बोलले. ते समजत नसल्यामुळे त्या दोघांना मी इंग्रजीत बोलण्याची विनंती केली, असे स्पष्टीकरण वॉर्नरने दिले आहे.