पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेट्स राखून धुव्वा उडवला. हा सामना ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या तडाखेबाज फलंदाजीने विशेष गाजवला. ११२ चेंडूत १२८ धावा करणाऱ्या वॉर्नरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. परंतु शतकवीर वॉर्नर केवळ फलंदाजीमुळेच नव्हे तर आणखी एका गंमतीशीर घटनेमुळे चर्चेत आहे.

मैदानात असं काय घडलं?

ऑस्ट्रेलियन संघ क्षेत्ररक्षण करत असताना एक पतंग अचानक मैदानात येऊन पडला. खरं तर हा पतंग वॉर्नर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता त्याच ठिकाणी येऊन पडला. त्यानंतर वॉर्नरने हा पतंग व त्याचा मांजा गुंडाळून मैदानावरील पंचांकडे सुपूर्त केला. हा सर्व प्रकार पाहून मैदानात एकच हास्यकल्लोळ झाला. आयसीसीने हातात पतंग घेऊन उभ्या असलेल्या वॉर्नरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
देशात सध्या संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण प्रामुख्याने पतंग उडवून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर वॉर्नरच्या फोटोवर नेटकऱ्यांनी गमतीदार कॉमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने तर “वॉर्नर भाऊ कन्नी लावून पतंग उडव” असे म्हणत वॉर्नरची खिल्ली देखील उडवली. तर काहींनी त्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

Kite stops play! Have you ever seen anything like this before? #INDvAUS #LoveCricket #Cricket

A post shared by ICC (@icc) on

 

पहिल्याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता वॉर्नर चौथ्या स्थानी पोहचला आहे. त्याने ११५ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. भारतीय संघाचा कर्णधार विराटने ११४ डावांमध्ये याआधी ही कामगिरी केली होती.

दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना, भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल अर्धशतकापासून अवघ्या ३ धावा दूर असताना बाद झाला आणि भारताची जोडी फुटली. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली.