श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ३-० असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी २० सामन्यात नाबाद राहिला. तिसर्‍या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद ५७ धावा केल्या आणि संघाला ७ गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याला नशिबाचीदेखील चांगलीच साथ मिळाली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम श्रीलंकेला फलंदाजीची संधी दिली. त्यात श्रीलंकेने १४२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवार डेव्हिड वॉर्नर याला फलंदाजी करताना नशिबाची जोरदार साथ मिळाल्याचे दिसून आले. वॉर्नर फलंदाजी करत असताना लाहिरू थिरीमनेने चेंडू टाकला. वॉर्नरने बचावात्मक फटका खेळत चेंडू थांबवला पण चेंडू बॅटला लागून स्टंपला लागला. तसे होऊनही वॉर्नरचे नशीब बलवत्तर ठरले. चेंडू स्टंपला लागला तरीही बेल्स पडली नाही. त्यामुळे अक्षरश: ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत वॉर्नरने तीन अर्धशतके ठोकली. तीनही सामन्यात नाबाद रहात ५० पेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद १०० धावा केल्या. दुसर्‍या सामन्यात त्याने नाबाद ६० धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात वॉर्नरने तिसऱ्या सामन्यात नाबाद ५७ धावा केल्या. यासह कोणत्याही उभय देशांच्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत ३ किंवा त्याहून अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कॉलिन मुनरो यांनी केला होता. २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कोहलीने नाबाद ९०, ५९ आणि ५० धावा केल्या होत्या.

तिसऱ्या टी २० सामन्यात वॉर्नरने ३७ धावा करत टी २० क्रिकेटमध्ये आपला ९,००० धावांचा पूर्ण केला. याबरोबर त्याने या सामन्यात ४९ धावा केल्या त्यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये २,००० धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये २,००० धावा करणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज ठरला. वॉर्नरने ७३ सामन्यात २,००० धावांचा टप्पा गाठला. कर्णधार फिंच ५५ सामन्यात १,७७२ धावांसह दुसर्‍या स्थानी आहे.