बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली आहे. आता उर्वरित दोन कसोटी सामन्यात वर्चस्व सिद्ध करत मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने मालिकेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांत रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही फलंदाजांची आपापल्या संघासाठीची कामगिरी मालिकेचे भवितव्य ठरवेल, असे मत ग्लेन मॅकग्रा याने व्यक्त केले. उभय संघांत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी मॅकग्रा फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमानिमित्त सिडनीचे स्टेडियम गुलाबी रंगात रंगणार आहे. पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी निराशा केली, तर भारतीय संघाकडूनही अजिंक्य रहाणेशिवाय आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी कोणीही फारशी चमक दाखवली नाही. त्यामुळे रोहित आणि वॉर्नर यांचे पुनरागमन मालिकेतील चुरस वाढवण्याच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे ठरेल, असे मॅकग्राला वाटते.

आणखी वाचा- अजिंक्यच्या नेतृत्वात ‘या’ १० खेळाडूंनी केले पदार्पण; नावं जाणून व्हाल चकीत

‘रोहित शर्माची कसोटी आकडेवरी जे स्पष्ट करते, त्यापेक्षा तो फार वरच्या दर्जाचा फलंदाज आहे. गेल्या दोन वर्षांत त्यानं कसोटी संघातही जम बसवला असून त्याच्या परतण्याने भारताच्या फलंदाजीची ताकद वाढेल. पुजारा अपयशी ठरत असल्याने रोहित शर्माने पुढाकार घेत रहाणेच्या साथीनं संघाला सावरले पाहिजे,’ असे मॅकग्रा म्हणाला.

आणखी वाचा- रहाणेची ‘कसोटी’ सुरुच; मात्र शास्त्री गुरुजी म्हणतात, “विराटसारखी कामगिरी…”

‘वॉर्नरच्या समावेशाची ऑस्ट्रेलियाला अत्यंत गरज आहे. अश्विन-बुमराह यांच्यापुढे स्मिथचा अद्याप निभाव लागलेला नाही. लाबूशेनलादेखील चांगल्या सुरुवाचीचे मोठ्या खेळीत रुपांतर करणे अवघड जात आहे. परंतु वॉर्नरच्या समावेशामळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी नक्कीच सुधारेल, याची मला खात्री आहे,’ असेही मॅकग्राने सांगितले. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असली तरीही ऑस्ट्रेलियाचाच संघ २-१ किंवा ३-१ अशा फरकाने मालिका जिंकेल, असा विश्वासही मॅकग्रानं व्यक्त केला.