क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंच्या वेतनवाढीच्या प्रश्नाला प्राधान्य देत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेतून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माघार घेऊ शकतात, असा इशारा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात अ‍ॅशेस मालिका नियोजित आहे.

मार्च महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरुष तसेच महिला क्रिकेटपटूंसाठी वेतनवाढीचा प्रस्ताव सादर केला. मात्र नव्या संरचनेनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या नफ्याचा वाटा खेळाडूंना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. खेळाडूंनी हा प्रस्ताव धुडकावला. त्यामुळे ३० जूननंतर वेतन मिळणार नसल्याचे अजब फर्मान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काढले आहे. या संदर्भात वॉर्नर बोलत होता. ‘मंडळाची भूमिका अशीच कायम राहिल्यास अ‍ॅशेस मालिकेत खेळायचे की नाही याबाबत खेळाडू कठोर निर्णय घेऊ शकतात. अ‍ॅशेस मालिका अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मात्र खेळाडूंचा विचार व्हायला हवा’ असे वॉर्नरने सांगितले.

खेळाडूंच्या वतीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलणी करीत आहे. दरम्यान या प्रकरणी तोडगा न निघाल्यास खेळाडू संपावर जाण्याची भीती माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केली. हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या बांगलादेशात होणाऱ्या कसोटी मालिकेचे आयोजन धोक्यात आहे. महिला विश्वचषकादरम्यान ३० जून तारीख येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटू विश्वचषकात सहभागी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख महिला खेळाडूंनी पुरुष खेळाडूंच्या भूमिकेला पाठिंबा देत विरोध तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंच्या संघटनेत सामंजस्य करार होत नाही तोपर्यंत गेल्या वर्षांसाठी करारबद्ध असणाऱ्या खेळाडूंना नवीन वर्षांसाठी करारबद्ध केले जाणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले.