भारतीय संघ येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सध्या दमदार फॉर्मात असला तरी यावेळीचे आव्हान काही सोपे नाही. भारतीय कसोटी संघाची कामगिरी लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने तोडीस तोड पूर्वतयारी केली आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि कर्णधार विराट कोहली या दोन खेळाडूंचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धसका घेतला आहे. अश्विनच्या फिरकीला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी योजना आखण्यास सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्या चांगल्या फॉर्मात असलेला डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानेही अश्विनची फिरकी भेदून काढण्यासाठीची योजना तयार केली आहे. खुद्द वॉर्नरने याबाबतची माहिती दिली. अश्विनसारख्या खेळाडूंबद्दल मला आदर आहे. तो नेहमी फलंदाजांचा विचार करून गोलंदाजी करतो. त्यामुळे मी त्याबद्दलची रणनीती आधीच ठरवली आहे, असे वॉर्नर म्हणाला.

 

२३ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी खेळविण्यात येणार आहे. अश्विनची क्षमता आणि ताकद लक्षात ठेवून मला फलंदाजी करायची आहे. त्याने त्याची तयारी केली असेल, पण माझीही रणनीती ठरली आहे. आमच्यात चांगली चुरस होईल, असेही वॉर्नर म्हणाला. विराट कोहलीचेही वॉर्नरने कौतुक केले. तो म्हणाला की, कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. तो क्रिकेटच्या तिनही प्रकारात चांगला खेळ करतो आहे. संपूर्ण देशाच्या अपेक्षा तो पूर्ण करतो. प्रतिस्पर्ध्यांना तो तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. जो रुट, स्टीव्ह स्मिथ, ड्युप्लेसिस आणि कोहली हे असे खेळाडू आहेत की ज्यांच्यावर जबाबदारी आली की त्यांच्या खेळ आणखी बहरतो. अशा खेळाडूंना थांबवणं खूप कठीण काम असतं. मोठी खेळी साकारणाऱयांमध्ये कोहली हे एक उत्तम उदारण आहे, असेही वॉर्नर पुढे म्हणाला.

स्लेजिंगचा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर वॉर्नरने स्लेजिंगचा काहीच उपयोग होणार नसल्याचे म्हटले. कोहली विरोधात स्लेजिंगचा काहीच उपयोग होणार नाही, कारण अशा खेळाडूंना परिस्थितीनुसार कशी फलंदाजी करायची हे चांगले अवगत असते. अशावेळी प्रतिस्पर्धी फलंदाज काय विचार करत आहे, हे जाणून घेऊन गोलंदाजी करणे गरजेचे असते. स्लेजिंग म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचे फक्त लक्ष विचलीत करण्याचा मार्ग आहे. पण त्यातून संघाला उपयोग होतो असे नाही, असे वॉर्नर म्हणाला.