11 December 2017

News Flash

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : अननुभवी भारतासमोर कोरियाचे आव्हान

लिएण्डर पेसच्या नेतृत्वाखालील युवा आणि अननुभवी संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेच्या

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: February 1, 2013 4:55 AM

लिएण्डर पेसच्या नेतृत्वाखालील युवा आणि अननुभवी संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेच्या सामन्यात कोरियाचा मुकाबला करणार आहे. या स्पध्रेसंदर्भातील काही मुद्यावरून अव्वल ११ टेनिसपटूंनी बंड केल्यामुळे आशिया/ ओशियाना गटाच्या या लढतीत भारताच्या संघात लिएण्डर पेस हा एकमेव अनुभवी खेळाडू आहे.
व्ही. एम. रणजित, विजयंत मलिक आणि पुरव राजा हे पेसच्या साथीला असून हे तिघेही यावेळी पदार्पण करणार आहेत. कोरियाविरुद्धची लढत जिंकण्यासाठी या तिघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या भारताच्या डेव्हिस चषक लढतीलाही वादाचा फटका बसला होता. त्यावेळी शिस्तभंगाच्या कारणास्तव महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांना भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते.
बंडखोर खेळाडूंचा भारतीय संघात समावेश झाला असता तर पूर्ण ताकदीचा भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता. मात्र आता कोरियाचे पारडे जड झाले आहे. पेसची ही ४९वी डेव्हिस चषक लढत आहे.
 शनिवारी होणाऱ्या दुहेरीच्या लढतीत पेस खेळेल तर शुक्रवार आणि रविवारी त्याची भूमिका मार्गदर्शकाची असेल. पेसच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, झिशान अली यांच्यासाठी भारताचे प्रशिक्षक या नात्याने पहिलीच डेव्हिस चषक लढत आहे तर ७० वर्षीय न खेळणारे कर्णधार एस. पी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही शेवटची लढत असेल. क्रमवारीत रणजित ५१७व्या तर मलिक ५४१व्या स्थानी आहे. त्यांना कोरियाच्या सुक यंग जिआंग आणि मिन ह्य़ुओक चो सामना करावा लागणार आहे. सुक क्रमवारीत ३२१व्या स्थानी तर मिनचा क्रमवारीत उल्लेख नाही. मात्र या दोघांकडे दोन डेव्हिस चषक लढतींचा अनुभव आहे. जिआँगने डेव्हिस चषकाच्या पाचपैकी दोन लढती जिंकल्या आहेत तर मिनला तीनपैकी एकाच लढतीत विजय मिळवता आला आहे.
जि सुंग नाम आणि यांग क्यू लिम हे कोरियाच्या संघातील अन्य सदस्य आहेत. लिम एकेरी विशेषज्ञ असूनही कोरियन संघव्यवस्थापनाने त्याची निवड दुहेरीच्या सामन्यांसाठी करण्यात आली आहे. अननुभवी भारतासमोर कोरियाचे आव्हान
जोकोव्हिच डेव्हिस लढत खेळणार
पॅरिस : सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा नोव्हाक जोकोव्हिच सर्बियाच्या डेव्हिस चषक लढतीसाठी सज्ज झाला आहे. सर्बियाचा मुकाबला बेल्जियमशी होणार आहे. जोकोव्हिच आणि जॅन्को टिप्सारेव्हिच सर्बियाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. दरम्यान, जेतेपदाचे दावेदार असलेल्या स्पेनच्या संघाताला राफेल नदाल, डेव्हिड फेरर आणि निकोलस अल्माग्रो यांची उणीव भासेल. रॉजर फेडररने स्वित्र्झलडच्या डेव्हिस चषक लढतीतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on February 1, 2013 4:55 am

Web Title: davis cup experience indian face challenge of korea
टॅग Davis Cup,Sport,Tennis