News Flash

रविवार विशेष : ओसाकाच्या निमित्ताने…

जगभरातील माध्यमांसमोर बोलण्याचे माझ्यावर दडपण येते

|| प्रशांत केणी

बातमीचा सार्वत्रिक प्रसार आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे विचारण्याची माध्यमांना संधी हे पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे लक्ष्य असते. क्रीडापटू, प्रशिक्षक, प्रशासक आदी मंडळी आपले मत या पत्रकार परिषदांमध्ये मांडतात. त्यामुळेच पत्रकार परिषदांना क्रीडाक्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जपानच्या चार गँरडस्लॅम विजेत्या नाओमी ओसाकाने पत्रकार परिषदा टाळण्यासाठी चक्क फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतूनच माघार घेतली. नैराश्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे कारण ओसाकाने दिले असले तरी त्यात तथ्य नसल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. आर्थिक दंड आणि तंबी दिल्यामुळे पुढील कारवाई स्पर्धेतून हकालपट्टीची होती, याची तिला पुरती जाणीव होती. त्यामुळेच तिने स्वत:हून हा निर्णय घेतला.

टेनिसमध्ये एटीपी, डब्ल्यूटीए, गँरडस्लॅम, डेव्हिस चषक अशा प्रत्येक स्पर्धेसाठी खेळाडूंना पत्रकार परिषदेला हजेरी लावणे बंधनकारक असते. विजयी आणि पराभूत अशा दोन्ही खेळाडूंना पत्रकार परिषद टाळता येत नाही. परंतु प्रश्नांची उत्तरे द्यायची इच्छा नसेल, तर ‘नो कॉमेंट्स’ म्हणजेच ‘प्रतिक्रिया द्यायची नाही’ हे तुम्ही स्पष्ट करू शकता. पत्रकार परिषदेतील चाणाक्षपणा हा महेंद्रसिंह धोनीने काही वर्षांपूर्वी दाखवला होता. वानखेडे स्टेडियमवर २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावल्यानंतर भारताचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा पत्रकार सॅम्युएल फेरीसने धोनीला ‘‘यापुढेही खेळत राहणार का?’’ असा प्रश्न विचारून डिवचले होते. तेव्हा शेजारच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमंत्रित करीत धोनीने त्यालाच प्रश्न विचारले. २०१९च्या विश्वचषकात मी खेळू शकेन का, या प्रश्नाला ‘‘हो’’ असं उत्तर देताच धोनी म्हणाला, ‘‘तूच तुझ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मित्रा, तू चुकीचा दारूगोळा, चुकीच्या वेळी वापरला आहेस!’’ ओसाकाला नेमके हेच जमले नाही. गँरडस्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये वैयक्तिक प्रवेशिका असतात, म्हणजेच डेव्हिस चषकाप्रमाणे राष्ट्रीय प्रतिनिधित्व तिथे नसते. त्यामुळे या निर्णयाची पूर्णत: जबाबदारी क्रीडापटूची असते.

‘‘सार्वजनिकरीत्या वक्तव्य करण्याचे धारिष्ट्य माझ्याकडे नाही. जगभरातील माध्यमांसमोर बोलण्याचे माझ्यावर दडपण येते,’’ अशी प्रामाणिक प्रतिक्रिया ओसाकाने व्यक्त केली. २०१८च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेपासून ओसाका मानसिक तणावाचा सामना करीत आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला बरीच मेहनत घ्यावी लागली. असुरक्षितता आणि चिंतेमुळेच पत्रकार परिषदांवर काट मारणे मला योग्य वाटले, असे ओसाकाने सांगितले. ओसाकाच्या निर्णयानंतर अनेकांनी तिची निर्भत्र्सना केली, तर काहींनी तिचे समर्थनसुद्धा केले.

क्रिकेटमध्ये साधारण २० वर्षांची पत्रकार परिषदांची परंपरा आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळेच त्याला प्रारंभ झाला. सामन्याआधी आणि सामना संपल्यावर ती बंधनकारक असते. परंतु तिरंगी स्पर्धा, द्विराष्ट्रीय मालिका यांच्यासाठी ती बंधनकारक नसते. त्यामुळे सराव, प्रवासाचा थकवा असे कोणतेही कारण देत पत्रकार परिषद टाळता येते. भारतीय संघ यात पटाईत आहे. त्यामुळे बऱ्याचदा साहाय्यक प्रशिक्षक किंवा नवख्या खेळाडूलाही पाठवले जाते. एके काळी पत्रकार कक्षात येऊन पत्रकार परिषद घेण्याची प्रथा होती. सचिन तेंडुलकरने कर्णधारपद सोडल्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन सचिव जयवंत लेले यांनी पत्रकार कक्षात येऊनच जाहीर केला होता. तसेच माजी क्रिकेटपटू संदीप पाटीलने निवृत्तीचा निर्णयही पत्रकार कक्षात घोषित केला. परंतु कालांतराने पुरस्कत्र्यांच्या हितासाठी पत्रकार परिषदेचे प्रक्षेपण क्रीडा वाहिन्या करू लागल्या. सचिन तेंडुलकरने २०१३मध्ये वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. तेव्हा प्रेक्षकपसंतीचे गणित आखून त्याच्या निर्वाणीच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

केपटाऊनमध्ये चेंडू फेरफार प्रकरणी दोषी आढळल्यामुळे कारवाई करण्यात आल्यानंतर स्टीव्ह स्मिथला सिडनीत पत्रकार परिषदेला सामोरे जावे लागले होते. ‘‘ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी या कटाची संपूर्ण जबाबदारी घेतो. हे माझ्या नेतृत्वाचे अपयश आहे. मला आयुष्यभर या निर्णयाचा पश्चात्ताप होईल,’’ असे स्पष्टीकरण देत स्मिथने क्रिकेटचाहत्यांची माफी मागितली होती.

तूर्तास, ओसाकाने फे्रंच स्पर्धेतून माघार घेत पत्रकार परिषदेपासून पिच्छा सोडवला आहे. परंतु आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तिच्या जपानमध्ये आहे. करोना साथीच्या कालखंडातील ऑलिम्पिकला देशातही विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर ओसाका या प्रश्नांचा कसा सामना करणार, हे औत्सुक्याचे ठरेल.

prashant.keni@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:00 am

Web Title: davis cup in tennis french open tennis championships athlete coach akp 94
Next Stories
1 ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर
2 ‘‘देशाकडून खेळण्यासाठी माझ्या कातडीचा रंग योग्य नाही, असं मला सांगण्यात आलं”
3 KKRला जबर धक्का..! पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार
Just Now!
X