ओरलॅँडो : टेनिसविश्वातील धुरिणांनी गुरुवारी ११८ वर्षे जुन्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या संरचनेत पायाभूत बदल करण्यास मान्यता दिली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १८ संघांमध्ये आणि एका आठवडय़ाच्या कालावधीत घेण्याच्या निर्णयावर सहमती झाली.

ओरलँडो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वार्षिक बैठकीत १२० देशांच्या प्रतिनिधींपैकी ७१.४३ टक्के सदस्यांनी या बदलांना सहमती दर्शवली. हे प्रमाण बदलांसाठी लागणाऱ्या दोनतृतीयांश प्रमाणापेक्षा अधिक असल्याने निर्णयाला बहुमताने मंजुरी मिळाली. बार्सिलोना फुटबॉलपटू गेरार्ड पिक या बैठकीसाठी स्पेनहून आला. त्याच्या नेतृत्वाखालील कॉसमॉस गटाने दिलेल्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे अध्यक्ष डेव्हिड हॅगर्टी आणि जपानच्या हिरोशी मिकितानी यांनी अनुमोदन दिले.

सध्याच्या स्पर्धा रचनेत खेळाडूंना फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळावे लागते. त्यामुळे मोठे खेळाडू या स्पर्धेत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळेच त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन संरचनेत सुटसुटीतपणा आणून पात्रता फेब्रुवारीत करुन राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होऊन अंतिम फेरीत दोन एकेरी, एक दुहेरी सामना घेऊन सर्वोत्कृष्ट तीनमधून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.