काही खेळाडूंचे नशीब खूप जोरदार असते, अनपेक्षितरीत्या त्यांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळते. विष्णू वर्धनबाबत असेच पाहायला मिळाले. साकेत मायनेनीने पायाच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीमधून माघार घेतली व त्याच्या जागी वर्धनला दुहेरीत लिएण्डर पेसच्या साथीने खेळण्याची संधी मिळाली आहे.

शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून या लढतीला प्रारंभ होत आहे. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या एकेरीच्या पहिल्या लढतीत युकी भांब्रीला न्यूझीलंडच्या फिन टिअर्नीशी खेळावे लागणार असून, त्यानंतर रामकुमार रामनाथनचा जोस स्टॅथमशी सामना होईल. दुहेरीचा सामना शनिवारी दुपारी चार वाजता होणार असून, त्यामध्ये पेस व वर्धन यांना आर्तेम सिटेक व मायकेल व्हीनस यांच्याशी झुंजावे लागणार आहे. एकेरीचे परतीचे सामने रविवारी दुपारी ३.३० वाजता सुरू होतील. व्हिसा नाकारला गेला अन् संधी मिळाली

भारतीय संघात ऐनवेळी संधी मिळालेला वर्धन हा खरे तर कझाकिस्तानला जायच्या तयारीत होता. तेथे स्पर्धात्मक सरावासाठी तो जाणार होता, मात्र त्याचा व्हिसा काही तांत्रिक कारणास्तव नाकारला गेला. पुन्हा त्याने व्हिसा मिळवण्यासाठी अर्जही केला होता. दरम्यान, त्याला बुधवारी सुरुवातीला पेस व त्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक झिशान अली यांच्याकडून डेव्हिस चषकाबाबत विचारणा करण्यात आली. त्याने त्वरित होकार दिला व गुरुवारी हैदराबादहून सकाळी तो शिवछत्रपती क्रीडानगरीत दाखलही झाला.

‘‘जरी मला व्हिसा मिळाला असता तरी डेव्हिसची संधी मी सोडली नसती. कारण माझ्यासाठी देशनिष्ठा महत्त्वाची आहे. मी यापूर्वी पेससोबत दुहेरीत खेळलो आहे. त्याने जेव्हा मला या लढतीविषयी कल्पना दिली, त्याच वेळी मी पुण्याला येण्याची तयारी सुरू केली. झिशान यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर मी त्वरित होकार दिला,’’असे वर्धनने सांगितले.

स्पेनविरुद्धच्या लढतीत साकेतबरोबर माझा चांगल्या रीतीने समन्वय झाला होता. त्याची अनुपस्थिती जाणवणार आहे, मात्र वर्धन हादेखील नैपुण्यवान खेळाडू आहे. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे आव्हान असले तरी ते शक्य आहे. एकेरीत त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे युकी व रामकुमार यांची कसोटी आहे.   लिएण्डर पेस

डेव्हिसमध्ये यशस्वी पुनरागमनासाठी उत्सुक झालो आहे. दुखापतीमुळे स्पर्धात्मक टेनिसपासून मी सहा महिने दूर होतो. त्याचा परिणाम माझ्या वैयक्तिक मानांकनावर झाला आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. डेव्हिस हे त्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.  युकी भांब्री

 

सामन्यांची कार्यक्रमपत्रिका अनुकूलच -अमृतराज

‘‘भारतीय संघाचे कर्णधार म्हणून माझा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे या सामन्याबाबत अन्य लोकांप्रमाणेच मलाही उत्कंठा निर्माण झाली आहे. सामन्यांची कार्यक्रमपत्रिका आम्हाला अनुकूलच आहे,’’ असे मत आनंद अमृतराज यांनी व्यक्त केले.

‘‘युकी हा टिअर्नी याच्यावर मात करू शकेल. रामकुमार हा युवा खेळाडू असून स्टॅथमविरुद्ध तो विजय मिळवू शकेल, मात्र त्यासाठी त्याला थोडासा संघर्ष करावा लागेल. साकेतची दुखापत ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे, मात्र काही गोष्टी टाळता येत नाहीत. त्याच्याऐवजी संघात स्थान देण्याबाबत रोहन बोपण्णाकडे विचारणा करण्यात आली होती. अखिल भारतीय टेनिस संघटनेने ही जबाबदारी घेतली होती. वर्धन हादेखील चांगला खेळाडू आहे. पेस याच्यासमवेत त्याने सामने खेळले आहेत.  त्यामुळे पेस याच्याशी योग्य समन्वय ठेवू शकेल असाच खेळाडू आवश्यक होता. त्यामुळेच आम्ही वर्धनला प्राधान्य दिले,’’ असे अमृतराज म्हणाले.

पुण्यातील लढतीसाठी भरपूर सराव केला आहे. त्यामुळे एकेरीत आत्मविश्वासानेच खेळणार आहे. आनंद व पेस यांच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळाले आहे. त्याचा फायदा मी येथे निश्चित घेईन.  रामकुमार रामनाथन