भारताचा पुरुष दुहेरीतील अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीमुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी जीवन नेदुशेझियानचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २९ आणि ३० नोव्हेंबरला रंगणार आहे. ३९ वर्षीय बोपण्णाआधी त्याचा सहकारी दिविज शरणने विवाहाच्या कारणास्तव पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला आपण अनुपलब्ध असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता पुरुष दुहेरीत लिएण्डर पेसच्या साथीने जीवन कशाप्रकारे खेळ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आयटीएफ’च्या निषेधार्थ कुरेशीचा न खेळण्याचा निर्णय

कराची : भारताविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेतील सामन्यातून पाकिस्तानचा आघाडीचा दुहेरीतील टेनिसपटू ऐसाम उल हक कुरेशीने माघार घेतली आहे. इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी सामना हलवण्याच्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) धोरणाच्या निषेधार्थ त्याने हा निर्णय घेतला आहे. इस्लाबादला सामना होणार असले, तरच मी उपलब्ध असेन, असे कुरेशीने ‘इन्स्टाग्राम’वर स्पष्ट केले आहे. भारताविरुद्धचा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने दाद मागितली होती. परंतु कुरेशीच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने पाकिस्तानची मागणी फेटाळल्याचे संकेत मिळत आहेत.