डेव्हिस चषक  टेनिस स्पर्धा :– पाकिस्तानविरुद्ध २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी होणारी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन या भारताच्या एकेरीतील आघाडीच्या टेनिसपटूंनी आपण उपलब्ध असल्याचे कळवले आहे. भारताच्या संघात त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या सुमितने गुरुवारी आपली उपलब्धता अखिल भारतीय टेनिस असोसिएशनकडे (एआयटीए) कळवली आहे. रामकुमारने काही दिवसांपूर्वीच आपण या लढतीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. ‘‘नवनियुक्त कर्णधार रोहित राजपालशी चर्चा झाल्यानंतर सुमितने ई-मेलद्वारे आपला होकार कळवला आहे,’’ असे एआयटीएकडून सांगण्यात आले.

प्रज्ञेश गुणेश्वर २९ नोव्हेंबर रोजी लगीनगाठ बांधणार असल्यामुळे तो या लढतीसाठी उपलब्ध असणार नाही. दुहेरीत अव्वल खेळाडू लिएण्डर पेस याचाही भारतीय संघात समावेश होणार आहे. मात्र महेश भूपतीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर एआयटीएवर ताशेरे ओढणाऱ्या रोहन बोपण्णाला संघात स्थान मिळते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.