आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून त्रयस्थ ठिकाणावर शिक्कामोर्तब

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा :- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील लढत कुठे रंगणार, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) या लढतीसाठी कझाकस्तान येथील नूर-सुलतान या त्रयस्थ ठिकाणावर मोहोर उमटवली आहे.

पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे होणारी ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय आयटीएफने घेतल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान टेनिस महासंघाने (पीटीएफ) त्याबाबतीत आयटीएफ डेव्हिस चषक समितीकडे दाद मागितली होती. भारतीय खेळाडूंना सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, असा युक्तिवाद ‘पीटीएफ’ने केला होता. मात्र आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला होता.

‘‘ही लढत नूर-सुलतान येथे खेळवण्यात येईल, असा निरोप आम्हाला आयटीएफने दिला आहे. पाकिस्तान महासंघाचा अपील जागतिक संघटनेने फेटाळून लावला आहे, असे सांगता येणार नाही. आता आम्ही नव्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज आहोत,’’ असे अखिल भारतीय टेनिस असोसिएशनचे (एआयटीए) मुख्य कार्यकारी अधिकारी अखुओरी विश्वदीप यांनी सांगितले.

नूर-सुलतान येथील अतिथंड वातावरण पाहता, हे सामने बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील. ‘‘बंदिस्त स्टेडियममध्ये सामने खेळायला आम्हाला आवडते. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याचा कोणताही प्रभाव या सामन्यावर होणार नसल्यामुळे बंदिस्त स्टेडियममध्ये खेळाचा दर्जा नक्कीच उंचावेल. वातावरण प्रतिकूल असल्यामुळे बंदिस्त स्टेडियममध्ये खेळल्याचा परिणामही शरीरावर जाणवेल,’’ असे भारताचे प्रशिक्षक झीशान अली यांनी सांगितले.

भारताने या लढतीसाठी अव्वल खेळाडूंचा संघ निवडला असला तरी रोहन बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन या एकेरीतील अव्वल खेळाडूंसह लिएण्डर पेस आणि जीवन नेदुनचेझियान हे दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

पाकिस्तानचे अपील फेटाळले

पाकिस्तान टेनिस महासंघाने (पीटीएफ) इस्लामाबाद येथून ही लढत अन्यत्र हलवल्याबद्दल आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (आयटीएफ) अपील केले होते. हे अपील फेटाळण्यात आले आहेत. ‘‘डेव्हिस चषक समितीकडे पीटीएफने दाद मागितली असली तरी आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने हे अपील फेटाळले आहेत. आयटीएफमार्फत ही लढत आता त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात येईल. ही लढत कझाकस्तानची राजधानी नूर-सुलतान येथे खेळवण्यात येईल,’’ असे आयटीएफने पत्रकात म्हटले आहे.