भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणारा दुसरा कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) तसा प्रस्ताव ठेवला आहे. जर खेळाडूंनी होकार दर्शवला तर भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येईल.

‘‘बीसीसीआयने आम्हाला दिवस-रात्र कसोटी सामन्याविषयी विचारणा केली आहे. आम्ही यावर विचारविनिमय करत आहोत. दोन-तीन दिवसांपूर्वी याविषयीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल,’’ असे बीसीबीचे क्रिकेट संचालक अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले.

बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली दिवस-रात्र कसोटीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून इंदूर येथे तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर होणार आहे.

बीसीबीचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले की, ‘‘खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतरच याविषयी निर्णय घेण्यात येईल. हा पूर्णपणे तांत्रिक मुद्दा असला तरी या सामन्यासाठी आमची तयारी कितपत झाली आहे, याचा विचार करूनच निर्णय कळवण्यात येईल.’’

भारताच्या विजयी वृत्तीचे अनुकरण करावे- चॅपेल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील सध्याचा दृष्टिकोन आणि त्यांची प्रत्येक सामना जिंकण्याची भूक याचे अनुकरण इतर संघांनी करावे,  असे मत ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश वगळता दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इतर देशांकडून कसोटी क्रिकेटचा दर्जा हा खूपच खालावलेला दिसत आहे. कसोटी क्रिकेट टिकवायचे असेल तर अधिकाधिक कसोटी सामने खेळवण्यात यावेत. जगभरातील लीगमुळे कसोटी क्रिकेटचे नुकसान होत आहे.’’