सध्या कॅरम चर्चेत आहे तो वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील वादविवादांमुळे. खेळाला वाद नवीन नाहीत, पण अन्य खेळ वादविवाद होऊनही कॅरमच्या फार पुढे निघून गेले आहेत, पण आशियाई, राष्ट्रकुल, ऑलिम्पिकपर्यंत कॅरमला अजूनही पोहोचता आलेले नाही. सार्क किंवा जागतिक स्पर्धाच्या काही वर्षांच्या निकालांवर दृष्टिक्षेप टाकला, तर या खेळावर भारतीयांचे वर्चस्व पाहायला मिळते. कॅरम जर या स्पर्धामध्ये खेळला गेला, तर भारताचे पदक निश्चित समजले जाऊ शकते, पण ऑलिम्पिक प्रवेशासाठी शासकीय अनास्थेबरोबरच कॅरम महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न कुठे तरी कमी पडताना दिसतात.
कॅरम म्हणजे सर्वसामान्यांचा, बहुतांशी घराघरांत खेळला जाणारा खेळ. घरातला प्रत्येक जण हा खेळ खेळतो. कॅरमचे नियम कोणाला शिकवावे लागत नाहीत, कारण लहानपणापासूनच प्रत्येक इमारतीमध्ये कॅरम चालूच असतो. यामधून बरेच खेळाडू घडतात, देशाचे प्रतिनिधित्व करतात, यशही मिळवतात, पण ऑलिम्पिकला खेळण्याची त्यांची इच्छा अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाही. रश्मी कुमारी, इल वजगी, योगेश परदेशी या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे, पण ऑलिम्पिकमध्ये खेळता येत नाही, याची सल त्यांच्याही मनात आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धा आणि सार्क स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून यश मिळवून देणारा योगेश परदेशी याबाबत म्हणाला की, ‘‘ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे आणि आपल्या कामगिरीमुळे तिरंगा उंचावला जावा, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसे माझेदेखील आहे. जागतिक स्तरावर जेव्हा आम्ही खेळायला जातो आणि तिरंगा आमच्या कामगिरीमुळे उंचावला जातो तेव्हा अभिमान वाटतो, पण ऑलिम्पिक हे ऑलिम्पिक आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळल्याने खेळाडूची ओळख होते. अन्य खेळांकडे जसे व्यवस्थापन आहे, तसे आमच्या खेळात नाही आणि त्यामुळेच आम्ही कुठे तरी कमी पडतो आहोत. महासंघ नक्कीच यासाठी प्रयत्नशील आहे, पण त्यांना यश मिळत नाही. कॅरमला जास्त प्रसिद्धी मिळत नाही, खास करून वृत्तवाहिन्या आम्हाला जास्त प्रसिद्धी देत नाहीत, याचादेखील विपरीत परिणाम खेळावर आणि खेळाच्या वाढीवर होतो. ऑलिम्पिकमध्ये जर कॅरमला स्थान देण्यात आले, तर भारताला एकेरीबरोबरच दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळू शकते.’’
पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, स्पर्धा, लोकप्रियता, प्रायोजक, उत्तम प्रशासक, महत्त्वाकांक्षा, दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर खेळाची प्रगती होत असते. कॅरमच्या स्पर्धा होतात, त्यांना लोकप्रियता मिळते, पण हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही. स्पर्धेला प्रायोजक मिळवताना आयोजकांच्या नाकीनऊ येतात, त्यामुळे या खेळात पैसा नाही. ग्लॅमर आणि पैसा नाही म्हणून चांगले प्रशासक याकडे वळत नाहीत. महासंघाकडे खेळाला पुढे न्यायची इच्छाशक्ती आहे, पण शासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही आणि त्यामुळेच कॅरम मोठय़ा स्तरावर खेळला जात नाही. सरकारदरबारी कॅरम अजूनही ‘क’ गटात आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये कॅरमचा समावेश करण्यात येत नाही. महासंघाचे यापूर्वीचे अध्यक्ष जे.पी. अगरवाल यांच्याकडून खेळाला फार मोठय़ा अपेक्षा होत्या, कारण अगरवाल हे गांधी परिवाराच्या जवळचे समजले जात होते, त्यांनी प्रयत्न केले खरे, पण पदरी निराशाच पडली. सध्या रसीबूल हुसेन यांना महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदावर एकमताने निवडून देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाचा खेळाला पुढे नेण्यात फायदा होईल, असे सर्वाना वाटते. केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकार कॅरमकडे गांभीर्याने पाहात नाही.
सरकारच्या नियमांनुसार प्रत्येक खेळाचे वर्गीकरण केले जात असते. यापूर्वीचे अध्यक्ष अगरवाल आणि सध्याचे अध्यक्ष हुसेनजी यांनी कॅरमला मोठय़ा स्तरावर नेण्याचे प्रयत्न केले आहेत. महासंघाने आंतरराष्ट्रीय असोसिएशनशी या संदर्भात बोलणी केली आहेत. त्यामुळे कॅरमसाठी तो यशाचा दिवस दूर नाही. येत्या २-३ वर्षांनंतर कॅरम आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला जाईल, अशी आशा महासंघाचे सचिव प्रताप बच्चर यांनी व्यक्त केली.
१९८८-८९ साली कॅरमची आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली, पण या संघटनेकडूनही मोठय़ा प्रमाणात काही हालचाली झाल्या नव्हत्या, पण गेल्या एक-दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय समितीने काही ठोस पावले उचलली आहेत. महासंघ आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा समित्यांशी बातचीत केली असून यामधून येत्या काही वर्षांमध्ये कॅरमला चांगले दिवस येतील, अशी आशा करू शकतो.
शासन कॅरमकडे मनोरंजनासाठी खेळला जाणारा खेळ, या दृष्टिकोनातूनच बघते, पण कॅरमसारख्या खेळाला जागतिक स्तरावर न्यायचे असेल, तर शासनाने नक्कीच आपली भूमिका बदलायला हवी. भारतीय महासंघ आणि आंतरराष्ट्रीय असोसिएशन उशिरा का होईना, पण जागे झाले आहेत आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय कॅरमपटूने आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये पदक पटकावून देशाची मान उंचवावी, अशी सामान्य दर्दी कॅरम चाहत्यांची अपेक्षा आहे. कॅरमने आतापर्यंत जे दिवस पाहिले त्याच्यापेक्षा अधिक चांगले दिवस त्याच्या वाटय़ाला येतील, अशी आशा करूया.