12 December 2017

News Flash

दिस जातील, दिस येतील..

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पात्रता निकषही पूर्ण करू न शकल्यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ बाद

मिलिंद ढमढेरे - milind.dhamdhere@expressindia.com | Updated: December 26, 2012 4:20 AM

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पात्रता निकषही पूर्ण करू न शकल्यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ बाद फेरी गाठण्याचा चमत्कार करू शकणार नाही, याची खात्री अनेकांना होती. अपेक्षेपेक्षा भारतीय संघाची कामगिरी आणखीनच लाजिरवाणी झाली. बारा संघांमध्ये भारतास बारावे स्थान मिळाले.
भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये अनेक वर्षे सुवर्णयुग साजरे करीत होता असे हल्लीच्या पिढीला सांगितले तर त्यांना ते खरे वाटणार नाही. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच आठ वेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघास ऑलिम्पिकच्या पात्रतेपासून वंचित राहण्याची वेळ बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळी आली. या पाश्र्वभूमीवर भारताने लंडन ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली त्या वेळी त्यांच्याकडून या स्पर्धेत फारशी चांगल्या कामगिरीची अपेक्षाच नव्हती. खुद्द संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनी स्पर्धेपूर्वी अनेक वेळा जाहीरपणे सांगितले होते, की ऑलिम्पिकमधील बाद फेरीचे स्वप्नही भारताने पाहू नये. त्यांचा हाच आत्मविश्वास भारतीय संघातील खेळाडूंनी खरा करून दाखविला.
साखळी गटातच भारतापुढे जबरदस्त आव्हान होते. नेदरलँड्स, न्यूझीलंड, जर्मनी, दक्षिण कोरिया, बेल्जियम यांचे आव्हान भारतापुढे साखळी गटात होते. साहजिकच बाद फेरी गाठण्यासाठी भारतास चमत्कार करून दाखवावा लागणार अशीच स्थिती होती. साखळी सामन्यांमध्ये भारताने नेदरलँड्स व न्यूझीलंड यांना चांगली लढत दिली. जर्मनी, कोरिया व बेल्जियम यांनी सफाईदार विजय मिळवताना भारतीय खेळाडूंना त्यांची जागा दाखवून दिली. भारतीय खेळाडूंनी या सामन्यांमध्ये अपेक्षेइतके कौशल्य दाखविले नाही. सांघिक कौशल्य, पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्यासाठी आवश्यक असणारी अचूकता, विजय मिळविण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास याबाबत भारतीय खेळाडू खूपच कमकुवत दिसले. नॉब्ज यांनी या स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंना भरपूर सरावाची संधी दिली होती. अनेक परदेशी संघांबरोबर त्यांनी सराव सामने खेळले होते. घोडय़ाला भले तुम्ही पाण्यापाशी नेले तरी पाणी प्यायचे, की नाही हे त्याच्या मनावर अवलंबून असते. तद्वत भारतीय संघाबाबत पाहावयास मिळाले. नॉब्ज यांनी सरावाच्या वेळी खेळाडूंना अनेक व्यूहरचना शिकविल्या होत्या. कोणत्या संघांविरुद्ध कसे खेळावयाचे हे त्यांनी या खेळाडूंना लिहूनही दिले होते. मात्र खेळाडूंनी या व्यूहरचनेप्रमाणे खेळ केला नाही तर नॉब्ज यांनी शिकवूनही काय उपयोग होणार. तीच स्थिती ऑलिम्पिकमध्ये पाहावयास मिळाली. भारतीय संघासाठी ठरविलेले डावपेच कागदावरतीच राहिले. प्रत्यक्ष मैदानावर भारतीय खेळाडूंनी सपशेल निराशा केली.
साखळी गटातच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की भारतावर ओढविली. अकराव्या क्रमांकांसाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघ लाज राखण्यासाठी चांगला खेळ करील, अशी अपेक्षा होती. मात्र तेथेही त्यांची फसगतच झाली. अकराव्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारतास दक्षिण आफ्रिकेने हरविले. शेवटचे स्थान मिळवत भारताने ऑलिम्पिकमधील सर्वात खराब कामगिरी नोंदविली.
संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना आपल्याशिवाय संघाचे पान हलत नाही असे वाटत होते. ऑलिम्पिकमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर नॉब्ज यांचा सल्ला मानून हॉकी इंडियाने कर्णधार भरत छेत्री, ड्रॅगफ्लीकर संदीपसिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघातून डच्चू दिला. चॅम्पियन्स स्पर्धेच्या वेळी अनेक वरिष्ठ खेळाडूंऐवजी तरुण खेळाडूंना हॉकी इंडियाने भारतीय संघात संधी दिली. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर लगेचच दिसून आला. चॅम्पियन्स स्पर्धेत सरदारासिंगच्या नेतृत्वाखाली भारताने उपान्त्य फेरीत धडक मारताना बेल्जियमसह अनेक अव्वल दर्जाच्या संघांवर विजय मिळविला. कांस्यपदकापासून भारतास वंचित राहावे लागले, मात्र तरुण खेळाडूंचा समावेश असला तरी भारतीय संघ चांगला खेळ करू शकतो हे या स्पर्धेत दिसून आले.
आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची परतफेड केली. त्यांनी पाकिस्तानला पराभूत करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. ऑलिम्पिकमधील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर भारताचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखविले तसेच गोल करण्याबाबतही खूपच अचूकता दाखविली.
भारतीय पुरुष संघाच्या तुलनेत भारतीय महिला संघाची कामगिरी आणखीनच खराब झाली आहे. त्यांना ऑलिम्पिकची पात्रताही पूर्ण करता आली नव्हती. सातत्यपूर्ण सांघिक खेळाचा अभाव हा कच्चा दुवा भारतीय महिला हॉकीपटू कधी घालविणार हाच प्रश्न कायम पडतो.
मुळातच भारतामधील हॉकी क्षेत्र हा सदैव वादाचा व टीकेचा विषय असतो. हॉकी इंडिया व भारतीय हॉकी महासंघ यांच्यातील मतभेद कधी दूर होणार हाच गहन प्रश्न आहे. हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर सत्ता कुणी गाजवायची यावरूनच सतत भांडणे होत असतात. मैदानावर भारताच्या अब्रूचे कितीही धिंडवडे उडाले तरी चालतील, आम्ही मात्र खुर्चीकरिता भांडतच राहणार, हीच वृत्ती भारतीय हॉकी संघटकांमध्ये दिसून आली आहे. या मुळावरच घाव घातल्याशिवाय भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळवू शकणार नाही. सध्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक हे भारतीय हॉकीसाठी वाळवंटातील मृगजळच आहे.
    

First Published on December 26, 2012 4:20 am

Web Title: days will gonedays will came back
टॅग Hokey,India,Sports