आयपीएल 2021मध्ये चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी केलेल्या पृथ्वी शॉने आपल्या यशाचे श्रेय भारताच्या माजी खेळाडूला दिले आहे. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने 72 धावा फटकावल्या आणि सामना जिंकवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर पृथ्वी शॉला संघातून बाहेर बसवण्यात आले. त्यानंतर पृथ्वीने फलंदाजीत अनेक सुधारणा केल्या आणि विजय हजारे ट्रॉफीपासून आयपीएल 2021च्या पहिल्या सामन्यापर्यंत आपला दमदार फॉर्म कायम राखला. ऑस्ट्रेलियामधील पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ काही खास कामगिरी करू शकला नाही आणि त्यालाही संघाबाहेर बसवण्यात आले.

भारताकडून 37 एकदिवसीय आणि 11 कसोटी सामने खेळणार्‍या प्रवीण अमरे यांना पृथ्वी शॉने आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने सांगितले, की जेव्हा ऑस्ट्रेलियामध्येही त्याला संघातून काढले गेले, तेव्हा त्याने प्रवीण अमरे यांची मदत घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार काम केले.

दिल्ली कॅपिटल्सची चेन्नई सुपर किंग्जवर मात

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. दिल्लीचा नवा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. सुरेश रैनाची अर्धशतकी खेळी आणि सॅम करनच्या झटपट धावांमुळे चेन्नईने दिल्लीसमोर 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दिल्लीचा विजय सोपा केला. पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या.  सामन्यात 85 धावांची खेळी केलेल्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.