फिरोज शाह कोटला येथे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघावर ४० धावांनी मात करत मुंबई इंडियन्स, बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. दिल्लीचा पराभव झाला असला तरी या समान्यामध्ये दिल्लीच्या संघातील फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये दिडशे बळी घेणारा अमित मिश्रा हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

सामन्याच्या सातव्या षटकामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि मिश्राने या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये दिडशे बळी घेणार मिश्रा हा दुसरा खेळाडू आहे. या आधी हा टप्पा लसिथ मलिंगाने ओलांडला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदांच्या यादीमध्ये मिश्रा दुसऱ्या स्थानावर आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माने निर्णय घेतल्यानंतर दोघांनी मुंबईला चांगली सुरवात करुन दिली. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असं वाटत असतानाच अमित मिश्राने आपल्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. आतमध्ये वळणारा मिश्राचा चेंडू रोहितला कळाच नाही आणि तो त्रिफळाचीत झाला. ३० धावांवर बाद झालेल्या रोहितनेही आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली. ३० धावांच्या या खेळीदरम्यान रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. टी-२० मध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विराट कोहलीने हा पराक्रम केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे पाच गोलंदाज

१६१ बळी: लसिथ मलिंगा (श्रीलंका) सामने: ११४

१५० बळी: अमित मिश्रा (भारत) सामने: १४०

१४६ बळी: पियुष चावला (भारत) सामने: १५२

१४३ बळी: ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज) सामने: १२६

१४१ बळी: हरभजन सिंग (भारत) सामने: १५३