05 March 2021

News Flash

अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद निराळाच – डी’व्हिलियर्स

‘आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळणे माझ्यासाठी फार मोठे आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत मला एकदाच अंतिम फेरीचा सामना खेळता आला आहे.

| May 26, 2016 03:19 am

विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने एबी डी’व्हिलियर्सला मिठी मारली.

एबी डी’व्हिलियर्स म्हणजे जगातील महान फलंदाजांपैकी एक. गेली सहा वर्षे तो आयपीएलमध्ये खेळत असला तरी एकदाच त्याला अंतिम फेरीत सहभागी होता आले आहे. मंगळवारी पहिल्या ‘क्लालिफायर’ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला डी’व्हिलियर्सने एकहाती जिंकवून दिले, त्यामुळे बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. त्यामुळेच हा आनंद डी’व्हिलियर्ससाठी काही औरच आहे.
‘आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळणे माझ्यासाठी फार मोठे आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत मला एकदाच अंतिम फेरीचा सामना खेळता आला आहे. आयपीएलमध्ये मी बंगळुरूकडून सहा वर्षे खेळतोय, पण एकदाच मला अंतिम फेरीत खेळता आले. हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे, माझे हे सौभाग्य आहे,’ असे डी’व्हिलियर्स म्हणाला.
पहिल्या ‘क्वालिफायर’मध्ये गुजरातने बंगळुरूपुढे १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचे सहा फलंदाज ६९ धावांवरच तंबूत परतले होते. त्यानंतर बंगळुरूने हा सामना जिंकणे, जवळपास अशक्यप्राय असेच वाटत होते. पण डी’व्हिलियर्सच्या अद्भुत फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने हा सामना जिंकला.
सामन्याबाबत डी’व्हिलियर्स म्हणाला की, ‘धवल कुलकर्णीने अप्रतिम भेदक मारा केला होता. त्यामुळे ‘पॉवर प्ले’मध्ये गुजरातने जवळपास सामना जिंकला होता. बंगळुरूमध्ये खेळत असताना झहीर खान मला एकदा म्हणाला होता की, ‘हा एक विनोदशीर खेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही कधीही सामना जिंकू शकता.’ हे त्याचे बोल माझ्या डोक्यात होते. त्यामुळे मी फक्त चेंडूंचा सामना करत राहिलो आणि त्यामुळेच आम्ही जिंकू शकलो.’
तो पुढे म्हणाला की, ‘या सामन्यादरम्यान पावसाचीही शक्यता होती, तसा संदेश मला विराटने पाठवला होता. पावसाची शक्यता असल्यामुळे चांगली धावगती असायला हवी, असे कोहलीने सांगितले होते. मी फक्त माझा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टीचा पोत पाहता १६० ही धावसंख्या सोपी नव्हती. पण जिंकण्याची ईर्षां मात्र कायम होती. त्यामुळे मला ही खेळी साकारता आली.’

‘अविश्वसनीय विजय’
* गुजरात लायन्सविरुद्धचा सामना आम्ही जिंकलो, यावर अजूनही विश्वास बसत नाही. एबी डी’व्हिलियर्सने अप्रतिम खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डी’व्हिलियर्स हा सर्वोत्तम फलंदाज आहे, असे मत बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
* यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सात सामन्यांपैकी बंगळुरूला फक्त दोनच सामने जिंकता आले होते. त्या वेळी बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल, असे वाटतही नव्हते.
* ‘मोठय़ा सामन्यामध्ये अव्वल खेळाडूचा कस लागत असतो. डी’व्हिलियर्सची ही खेळी पाहिल्यावर मी फक्त त्याला कुर्निसात करू इच्छितो. प्रचंड दडपणाखाली असताना तो डगमगला नाही. त्याने शांतपणे त्याचे फटके खेळले, इक्बाल अब्दुल्लालाही तो मार्गदर्शन करत होता. संघासाठी डी’ व्हिलियर्स हा नेहमीच प्रेरणादायी आहे. त्याची ही खेळी नजरेचे पारणे फेडणारी होती. त्याच्या या खेळीचे वर्णन शब्दांत करता येणार नाही,’ असे कोहली म्हणाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 3:19 am

Web Title: de villiers best current batsman kohli
Next Stories
1 हैदराबादचा दिमाखदार विजय
2 वॉवरिन्का, निशिकोरी तिसऱ्या फेरीत
3 माद्रिदच्या विजयासाठी रोनाल्डोची तंदुरुस्ती महत्त्वाची
Just Now!
X