दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डीव्हिलियर्स याने नुकतीच अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती स्वीकारली. त्याने घेतलेला निवृत्तीचा निर्णय अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. डीव्हिलियर्सने मात्र आपण थकलो असल्याची कबूली देत निवृत्ती जाहीर केली. याबाबत अनेक क्रिकेटपटूंनी आपापली मते मांडली. डीव्हिलियर्सचा जवळचा मित्र आणि संघातील सहकारी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानेही त्याच्या निवृत्तीबाबत हळहळ व्यक्त केली. मात्र त्याच्या निर्णयाचा आदर राखला जायला हवा, असेही तो म्हणाला.

एका मुलाखती दरम्यान स्टेन बोलत होता. यावेळी त्याने डीव्हिलियर्सची एक अशी आठवण सांगितली जी या आधी कोणालाही माहिती नव्हती. किंवा चर्चेत आलेली नव्हती. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात एबी डीव्हिलियर्सने ४४ चेंडूत तब्बल १४९ धावा ठोकल्या. त्याबरोबरच डीव्हिलियर्सने ३१ चेंडूत शतक झळकावत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम रचला.

खरं तर, डीव्हिलियर्सकडून हा विक्रम रचला गेलाही नसता. पण त्या दिवशी अशी काही गोष्ट घडली की डीव्हिलियर्सने आपल्या फलंदाजीच्या सुरुवातीपासूनच विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि हा विक्रम रचला. याबाबत डेल स्टेनने सांगितले की त्या दिवशी पहिला गडी बाद झाल्यावर प्रशिक्षक रसल डॉमिंगो यांनी डीव्हिलियर्सला फलंदाजीसाठी जाण्यास सांगितले. मात्र डीव्हिलियर्सने त्या जागी डेव्हिड मिलर याला पाठवण्याची विनंती केली. मिलर उत्तुंग षटकार लिलया मारू शकतो, त्यामुळे त्याला फलंदाजीस पाठवावे, असे त्याचे म्हणणे होते. मात्र डॉमिंगो यांनी डीव्हिलियर्सलाच फलंदाजीस जाण्यास सांगितले.

प्रशिक्षक ऐकत नाहीत, असे पाहिल्यावर डीव्हिलियर्स थोडा चिडून आणि घाईघाईत ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि झटपट तयार होऊन मैदानावर गेला. पण मध्ये पायऱ्यांवर मात्र डीव्हिलियर्स पाय घसरल्याने पडला आणि पूर्णपणे आडवा झाला. ही गोष्ट कुठेही रेकॉर्ड झाली नाही. आणि मैदानावर यायच्या वेळी डीव्हिलियर्सनेही असे काही झाले असल्याचे जाणवून दिले नाही. पण मैदानात आल्यावर त्याने ‘न भूतो, न भविष्यती’ अशी फलंदाजी केली आणि अखेर विश्वविक्रम केला, असे स्टेनने सांगितले.

विंडीजला त्या दिवशी एका वादळी खेळीला सामोरे जावे लागले. मात्र त्या साठी त्यांनी डीव्हिलियर्स नव्हे, तर प्रशिक्षक डॉमिंगो आणि मिलर यांना जबाबदार धरावे, असेही स्टेन मजेत म्हणाला. या सामन्यात डीव्हिलियर्सने तब्बल १६ षटकार खेचले होते. मात्र, त्याला १४९ धावाच करता आल्या. त्यामुळे तो आपल्या दीडशतकापासून एक धाव दूर राहिला.